रावेर तालुका हादरला : केर्‍हाळ्यात जुन्या वादातून तरुणाचा खून


रावेर (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : दारूच्या नशेत वाद उफाळून आल्यानंतर रावेर तालुक्यातील केर्‍हाळा येथे 25 वर्षीय तरुणाची मारहाण व ग्राईंडरने वार करीत हत्या करण्यात आली. मंगळवार, 6 रोजी दुपारी दिड वाजता घडलेल्या घटनेने रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली. राजू रवींद्र कापडे (25, केर्‍हाळा, ता.रावेर) असे खून झालेल्या तरुणाचे तर रामसिंग चिंधू भील (72) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हाणामारीत संशयीत जखमी झाल्याने त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत.

दारूच्या नशेत वाद !
रावेर तालुक्यातील केर्‍हाळा गावातील इंदिरा नगर परिसरात रामसिंग चिंधू भील (72) हा वास्तव्यास असून तो मिस्तरी काम करतो व एकटाच वास्तव्यास आहे. याच गावात राजू रवींद्र कापडे हा तरुणदेखील वास्तव्यास असून दोघांचा एकमेकांशी परिचय आहे. काही दिवसांपूर्वी राजू हा भील यांच्यासाठी जेवणाचा डबा देखील आणत होता मात्र गेल्या काही दिवसांपासून उभयंतांमध्ये काहीतरी कारणावरून बिनसले व त्यातच मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास भील व कापडे हे मद्यधूंद असतानाच त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला व दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. यावेळी भील यांनी लोखंडी आसारी कापण्याच्या ग्राईंडर मशीनने कापडे या तरुणाच्या मानेवर हल्ला केल्याने तो रक्तबंबाळ होवून जागीच कोसळले तर ग्रामस्थांनी या हाणामारीनंतर भील यांना ताब्यात घेत एका घरात कोंडून ठेवत रावेर पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना माहिती कळवली.

निरीक्षकांचा फोन अन् यंत्रणा दाखल
जळगावात आयोजित गुन्हे आढावा बैठकीला उपस्थित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना केर्‍हाळा गावातील तुंबळ हाणामारीची माहिती मिळताच त्यांनी रावेर पोलिसांना माहिती कळवली. सहा.निरीक्षक अमूल बच्छाव, हवालदार योगेश महाजन, प्रमोद पाटील, विकार शेख आदींनी केर्‍हाळा गावातील इंदिरानगर गाठले. यावेळी अत्यवस्थ अवस्थेतील कापडे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते तर संशयीत रामसिंग भील यांना एका घरात कोंडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. यावेळी भील यांनी कापडे या तरुणाशी वाद झाल्याचे सांगत हाणामारी झाल्याची कबुली दिली.

संशयीताविरोधात खुनाचा गुन्हा
अत्यवस्थ अवस्थेतील कापडे या तरुणाला रावेर ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करीत राजू कापडे यांना मृत घोषित केले. मयत तरुणाच्या खून प्रकरणी संशयीत रामसिंग भीलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. भर दिवसा केर्‍हाळा गावात किरकोळ वादातून झालेल्या खुनाने खळबळ उडाली आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !