मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कामगिरी : 16 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त
आग्रा जिल्ह्यातील चालकाला अटक : गुटखा तस्करी ऐरणीवर
मुक्ताईनगर (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करत एकूण 15 लाख 88 हजार 500 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा/तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. या प्रकरणी महिंद्रा बोलेरो पिकअप चालक शुभमसिंग विद्यराम (25, रा.निनावाचा, ता.किराबली, जि.आग्रा, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर निरीक्षक आशिषकमार अडसुळ यांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाला निर्देश दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. 6 रोजी संशयास्पद महिंद्रा बोलेरो पिकअप (एच.आर.84 1073) आल्यानंतर तिला थांबण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता सुसाट पळवल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करीत मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली परिसरातून वाहनासह चालकास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. वाहनातील मालाबाबत चालकाकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने अन्न व औषध प्रशासन, जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांच्या मार्फत दोन पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यात प्रतिबंधीत गुटख्यासह तंबाखूचा साठा आढळला.
लाखोंचा गुटखा जप्त
तपासणीदरम्यान वाहनात 10 लाख 12 हजार 500 रुपये किंमतीचा प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, पाच लाख 76 हजार रुपये किंमतीचा प्रिमियम जेड एन जाफरानी जर्दा, तीन लाख 25 हजार रुपये किंमतीची पांढर्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप मिळून
अशा प्रकारे 15 लाख 88 हजार 500 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा/तंबाखूजन्य पदार्थ आणि 3 लाख 25 हजार रुपये 19 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
उत्तर प्रदेशातील चालक ताब्यात
पिकअप चालक शुभमसिंग विद्यराम (25, रा.निनावाचा, ता.किराबली, जि.आग्रा, उत्तरप्रदेश) विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या चौकशीत हा गुटखा कुठून कुठे नेण्यात येणार होता? याबाबत स्पष्टता येणार आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी आदींच्या पथकाने केली.


