यावलला भाजपच्या महिला नगरसेविकेला मारहाण करीत विनयभंग

आमदारांच्या नावानेदेखील सार्वजनिकरित्या शिविगाळ


यावल (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : शहरात गुरुवारी रात्री दुर्गोत्सव मंडळाकडून विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून वाजंत्रीसाठी रात्री दहा वाजेची वेळ निर्धारित करण्यात आली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचनाही करण्यात आल्या. त्यानुसारच यावल शहरात रात्री दहा वाजता वाद्य बंद झाले मात्र वाद्य बंद झाल्याच्या रागातून एकाने थेट भाजपा आमदारांच्या नावाने सार्वजनिकरित्या शिवीगाळ केली तसेच भाजपच्या एका महिला नगरसेविकेच्या घरी जाऊन भाजपाच्या सर्व नगरसेवकांविषयी अर्वाच्च भाषेचा वापर करीत अश्लील शिविगाळ करीत मारहाण करीत महिला नगरसेविकेचा विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्रीनंतर एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात ?
यावल शहरात भारतीय जनता पार्टीच्या एका महिला नगरसेविका आपल्या घरी असताना गुरुवारी रात्री यावल शहरातील दुर्गोत्सव विसर्जन मिरवणूकीत वाद्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दहा वाजता बंद केल्याच्या रागातून घनश्याम दिलीप पाटील (बोरावल गेट) हा गेला व तेथे घराबाहेर जाऊन जोरजोराने भाजपा आमदारांचे नाव घेऊन त्यांना सार्वजनिकरित्या शिवीगाळ केली तसेच यावल शहरातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांविषयी अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ केली. शिविगाळ ऐकून महिला नगरसेवक आणि त्यांचे पती घराच्या बाहेर आले आणि त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिला नगरसेवकाच्या पतीला शिविगाळ करून मारहाण केली आणि या महिला नगरसेविकेच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !