‘उजेड पेरणारी माणसं’ : वैविध्यपूर्ण ज्ञानचक्षूंचा इतिहास उलगडणारा ग्रंथ


माणिक गोंडाणे, गोंदिया
भुसावळ (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक आनंदा लोटन पाटील यांचा ‘उजेड पेरणारी माणसं’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखसंग्रह म्हणजे समाजकार्याची, कला-संस्कृतीची आणि विविध क्षेत्रांत ध्येयाने पेटून उठलेल्या माणसांची माहिती देणारा एक कृतज्ञ दस्तावेज आहे. ’दिव्य मराठी’ वृत्तपत्रात सलग 100 आठवडे प्रसिद्ध झालेल्या स्तंभांमधून या पुस्तकाचा जन्म झाला आहे.

लेखक जेव्हा आपल्या कठोरा (ता.चोपडा) या जन्मगावी वडिलांना भेटायला गेले, तेव्हा वडिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले होते. गेली 25 वर्षे तुझं लिहिणं चाललंय, घरात हजारो पुस्तकं आहेत; पण तुझ्या नावाचं पुस्तक कधी येणार? वडिलांच्या याच शब्दांना सार्थकी लावण्यासाठी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी लेखकाने कोरोना काळात या पुस्तकाचा पाया रचला. दुर्दैवाने, हे सुख पाहण्यासाठी वडील हयात नसले तरी, पत्रकाराची तटस्थता आणि लेखकाची संवेदनशीलता यांचा सुंदर संगम या पुस्तकातून रसिकांसमोर आला आहे.

या ग्रंथात कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित 84 व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा वेध घेण्यात आला आहे. यात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या चळवळीतील भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार जितेंद्र सुरळकर, 3500 हून अधिक गीते लिहिणारे सारंग पवार आणि आई-वडिलांच्या कष्टाचे गुणगान गाणारे कवी नामदेव कोळी यांचा समावेश आहे.

वयाच्या नव्वदीतील उद्योजक-साहित्यिक अरुण नारखेडे, आंबेडकरी विचारवंत विकास पाटील, विनोदी लेखक प्रा. अनिल सोनार, कालिदास पुरस्कारप्राप्त शिल्पकार संतोष साळवे आणि वेटर ते डॉक्टर असा प्रवास करणारे डॉ. युवराज पवार यांच्या जीवनसंघर्षाला येथे शब्दबद्ध केले आहे.

त्याचप्रमाणे विद्रोही कवी डॉ. मिलिंद बागुल, भुसावळचे निष्काम कर्मयोगी प्रेमचंद कोटेचा, ’पिशवीवाल्या बाई’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजसेविका शैला सावंत, चित्राभ्यासक लीलाधर कोल्हे, ’ज्युनिअर चार्ली चॅप्लिन’ मनोज पांडव, ज्येष्ठ गझलकार रमेश सरकाटे आणि चित्रकार विजय जैन यांच्या कार्याचा परिचय यात मिळतो.

स्त्रीवादी लेखिका सीमा भारंबे, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बाळकृष्ण विसपुते (कविकुमार), कवी रमेश पवार, अनुवादक डॉ. हेमा जावडेकर, अमूर्त चित्रशैलीचे महर्षी प्रभाकर कोलते आणि वंचितांसाठी ’शिक्षणघर’ चालवणार्‍या वैशाली झाल्टे यांच्या योगदानाचा गौरव यात केला आहे.

याशिवाय ’नाटकवाली बाई’ जयश्री पुणतांबेकर, स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र चालवणारे पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, ’सावित्रीची लेक’ राजेश्री सुरवाडे, लेखकाचे मार्गदर्शक सुरेश अलिझाड सर आणि अवघ्या 17 व्या वर्षी गिनीज बुकमध्ये नोंद करणारा तबलावादक उत्कर्ष नेमाडे यांच्या प्रेरणादायी कथा वाचकांना खिळवून ठेवतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी लाल आणि काळ्या रंगाच्या संयोजनातून अत्यंत प्रभावीपणे रेखाटले आहे. प्रकाशिका प्रभा देवा झिंजाड (पेन पब्लिशिंग हाऊस, पुणे) आणि लेखक देवा झिंजाड यांनी मलपृष्ठावर लिहिलेले ब्लर्ब पुस्तकाचे मोल वाढवते. प्रसिद्धीचा ध्यास न घेता समाजातील अंधार दूर करणार्‍या ’उजेड पेरणार्या’ निष्ठावंतांचा हा परिचय वाचकांच्या अंतरात्माला स्पर्श करतो. वाचक आणि साहित्यप्रेमींनी या ग्रंथाचा आस्वाद घेऊन लेखकाच्या या प्रवासाला दाद द्यावी, असा हा संग्रही ठेवण्याजोगा ग्रंथ आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !