मेहुणबारे विद्यालयाच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांची चाळीसगाव पंचायत समितीला अभ्यास भेट


चाळीसगाव (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : स्थानिक प्रशासन व्यवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मेहुणबारे येथील कला शाखेच्या 50 विद्यार्थ्यांनी चाळिसगाव पंचायत समिती कार्यालयाला क्षेत्रभेट दिली. राज्यशास्त्राच्या प्रा.उर्मिला एस.राजपूत यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नुकतेच पदभार स्वीकारलेले नूतन गट विकास अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. सौरव रविंद्र निकम यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यालयात येणार्‍या नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पंचायत समितीला ’भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे असलेला मार्गदर्शक बॅनर भेट दिला.

विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांना भेटी देऊन शासकीय योजना व कामकाजाची माहिती जाणून घेतली

सामान्य प्रशासन विभाग
सहाय्यक प्रशासन अधिकारी मिलिंद सुपे व प्रशासन अधिकारी किरण मालाजंगम यांनी अंतर्गत व्यवस्थापन आणि समन्वयाबाबत माहिती दिली.

समाज कल्याण विभाग
संगीता जाधव यांनी मागासवर्गीय, दिव्यांग व वंचित घटकांसाठीच्या घरकुल व कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

शिक्षण विभाग
गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन, शिष्यवृत्ती, आरटीआय आणि 10वी-12वीच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत होणार्‍या झूम मिटिंग नियंत्रणाची माहिती दिली

आरोग्य विभाग
तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत बोरसे यांनी ग्रामीण आरोग्य सेवा, साथरोग नियंत्रण आणि पाणी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.

महिला व बाल कल्याण विभाग
बालविकास प्रकल्प अधिकारी साधना कापडणे, पर्यवेक्षिका वहीदा तडवी व ऋचिका कोलीतकर यांनी कुपोषण निर्मूलन, अंगणवाडी कामकाज आणि ’माझी कन्या भाग्यश्री’, ’लेक लाडकी’ व ’प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनांची माहिती दिली.

इतर विभाग: कृषी विभागाचे प्रवीण महाजन, बांधकामचे सुशील खरात, सिंचनचे दीपक बावीस्कर आणि सहाय्यक लेखा अधिकारी शंकरसिंग कछवे यांनी आपापल्या विभागांच्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या यशस्वी व अभ्यासपूर्ण क्षेत्रभेटीसाठी मेहुणबारे विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र विश्वनाथ वाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !