धुळे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : एक कोटी 55 लाखांचे अन्नपदार्थ भेसळीच्या संशयातून जप्त

‘सुरक्षित अन्न - सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत विशेष तपासणी मोहीम ; 17 अन्न परवाने निलंबित


धुळे (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : दिवाळी सणाच्या कालावधीत मिठाई, फराळ, खाद्यतेल तसेच अन्य अन्नपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भेसळखोर कार्यरत होत असल्याने अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाच्या वतीने 1 सप्टेंबर 2026 ते नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान धुळे विभागात एकूण 139 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून त्यांचे प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहेत.

धडक कारवाईने खळबळ
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे तसेच सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न – सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 21 ठिकाणांहून 40 हजार 525 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 92 लाख 22 हजार 948 रुपये इतकी आहे. यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर, खाद्यतेल, स्पेशल बर्फी, सोनपापडी व फरसाण यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश आहे.









63 लाखांचा गुटखा जप्त
प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित पदार्थांची 06 ठिकाणांहून एकूण 34,816 पाकिटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत रु. 63 लाख 18 हजार 621 रुपये इतकी आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 28 प्रकरणांत तडजोड शुल्कापोटी एकूण एक लाख 74 हजार 500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच न्यायनिर्णयासाठी एकूण 08 प्रकरणांचे प्रस्ताव तयार करून ते नाशिक कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

अन्नपदार्थ उत्पादन करणार्‍या ठिकाणी आवश्यक स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे पालन न केल्याप्रकरणी 13 अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी चार अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दिवाळी फराळ विक्रेत्यांवर विशेष लक्ष
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चकली, लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी आदी फराळाचे पदार्थ तयार करून विक्री करणार्‍या हंगामी विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा व सदर परवाना दर्शनी भागात लावावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या विक्रेत्यांच्या उत्पादन व विक्री ठिकाणांची तपासणी करण्यात येत असून फराळ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे घटक पदार्थ तसेच तयार फराळाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. ही तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.

ग्राहकांनीही घ्यावी काळजी
नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. अन्नपदार्थांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादन दिनांक व वापरण्याची अंतिम मुदत तपासूनच खरेदी करावी. दूधापासून तयार केलेल्या मिठाईचा वापर संबंधित विक्रेत्याने दिलेल्या सूचनेनुसार साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या आत करावा. बंगाली मिठाई शक्यतो खरेदी केलेल्या दिवशीच वापरावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
या मोहिमेतील सर्व तपासण्या व कारवाया (आयुक्त)
तुकाराम मुंडे, सह आयुक्त (अन्न) मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न), गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली. आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !