वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच : मुख्याध्यापक जाळ्यात तर संस्थाचालक पसार !


नाशिक (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : शिक्षकाला वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तर संस्थाध्यक्ष मात्र पसार झाला आहे. संजय दगडू राणे असे अटकेतील मुख्याध्यापकाचे तर संस्थाध्यक्ष श्रीप्रकाश चंद्रमलजी बोरा हे पसार संशयीताचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षक भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये बी.एड. प्रशिक्षण पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र संस्थेकडे सादर केले होते. त्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी जानेवारी 2025 मध्ये अर्ज केला होता.









या लाभासंदर्भातील थकीत वेतनाची रक्कम व इतर आर्थिक लाभ मंजूर करून देण्यासाठी मुख्याध्यापक संजय दगडू राणे यांनी संस्थाध्यक्ष श्रीप्रकाश चंद्रमलजी बोरा यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार 2 नोव्हेंबर 2026 रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईचे नियोजन केले.

त्यानुसार शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सापळा रचण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय दगडू राणे यांनी पंच साक्षीदारांसमक्ष तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. या प्रकरणात संस्थाध्यक्ष श्रीप्रकाश चंद्रमलजी बोरा यांचाही सहभाग असून त्यांनी लाच रक्कम राणे यांच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांनी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन : शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचार्‍याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !