51 लाखांच्या कपड्यांचा अपहार करीत अमळनेरात आयशर पेटवला : एरंडोलच्या चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

गत ऑक्टोबर महिन्यात मांगीर बाबा टेकडीजवळ पेटवले वाहन ः मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय


अमळनेर (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : अमळनेर ते जळगाव रस्त्यावरील मांगीर बाबा टेकडीजवळ आयशर वाहनातील सुमारे 51 लाख रुपये किंमतीच्या कपड्यांचा अपहार करीत आयशर वाहनाला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाहनचालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मालाची परस्पर विल्हेवाट लावून वाहनात नव्या कपड्यांऐवजी वेगवेगळ्या रंगाच्या धाग्यांचा भुसा भरला व वाहनाला आग लावल्याचा आरोप करीत अमळनेर पोलीस ठाण्यात वाहनचालक संजय रमेश पाटील (ताडे, ता.एरंडोल) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

नेमका प्रकार काय?
ट्रान्सपोर्ट व्यावसायीक आकिब शेख अल्ताफ (22, प्रताप नगर, लिंबायत, सुरत, गुजरात) यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी तथा आयशर चालक संजय रमेश पाटील (ताडे, ता.एरंडोल, ह.मु.डिंडोली, सुरत) याच्याकडे आयशर कंपनीचे वाहन (क्रमांक डी.एन. 01 के. 5153) चालविण्याची जबाबदारी होती. 16 ते 17 ऑक्टोबर रोजी आरोपी चालकाला सुरत येथून दोन लाख 94 हजार 976 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे धाग्यांचे कार्टून तसेच 48 लाख पाच हजार 24 रुपये किंमतीचे साड्यांचे 143 कार्टून अमळनेरात डिलेव्हरी करायचे होते मात्र आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहनातील मालाची परस्पर विल्हेवाट लावत अमळनेर शहराजवळील अमळनेर-जळगाव रस्त्यावरील मांगीर बाबा टेकडीपुढे आयशर वाहनाला आग लागली. या आगीत 10 लाखांचे वाहन व 51 लाखांचे कपडे मिळून 61 लाखांचे नुकसान झाले.

अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी 15 नोव्हेंबर 2026 रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !