लातूरमध्ये खासगी सावकारीचा धक्कादायक प्रकार ; सव्वा कोटी परत करूनही तीन कोटींची मागणी !
लातूर (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : आर्थिक अडचणींचा फायदा घेत खासगी सावकारांकडून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कर्जाची रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही पैशांचा तगादा लावून धमकावण्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. एका व्यावसायिकाने एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्यापोटी तब्बल एक कोटी 25 लाख रुपये परत केले. मात्र, तरीही आणखी तीन कोटी रुपयांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्लॉटच्या मालमत्तेची कागदपत्रेही बळजबरीने हिसकावून नेल्याची तक्रार आहे. या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक कोटींच्या कर्जापोटी 1.25 कोटींची परतफेड
लातूर येथील नांदेड कॉलनी परिसरात राहणारे अविनाश अमर कामदार (54) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रथवाडी येथील गणेश बोपणे याने कामदार यांना दरमहा एक टक्का व्याजदराने एक कोटी रुपये कर्जाऊ दिले होते. जून 2026 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा आर्थिक व्यवहार झाला. या कर्जापोटी कामदार यांनी एक कोटी 25 लाख रुपये परत केले. मात्र, मूळ रकमेपेक्षा 25 लाख रुपये अधिक देऊनही आरोपींकडून आणखी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी
आरोपींनी दररोज एक टक्का व्याजदराने पैसे दिल्याचा दावा करत अतिरिक्त रकमेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढी मोठी रक्कम देण्यास कामदार यांनी असमर्थता दर्शविल्यानंतर आरोपी त्यांच्या कार्यालयात घुसले. यावेळी शिवीगाळ करून पैसे न दिल्यास उचलून नेऊन मारहाण करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्लॉटची मालमत्तेसंबंधी कागदपत्रेही बळजबरीने हिसकावून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ; तपास सुरू
या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या आर्थिक व्यवहारामागील नेमके स्वरूप, पैशांची मागणी आणि धमकीच्या आरोपांची पोलीस चौकशी करीत आहेत.
बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
आर्थिक अडचणीच्या काळात तातडीने पैशांची गरज भासल्याने अनेक जण खासगी सावकारांकडून कर्ज घेतात मात्र अवाजवी व्याजदर, वारंवार पैशांचा तगादा, धमकावणे आणि मालमत्तेची कागदपत्रे बळजबरीने ताब्यात घेण्यासारख्या प्रकारांमुळे कर्जदार अडचणीत सापडतात. लातूरमधील या घटनेमुळे बेकायदेशीर खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
