एक हजारांची लाच भोवली : काळखेडे ग्राममहसूल अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी मागितली लाच : लाचखोर हादरले
गणेश वाघ
भुसावळ (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे तालुक्यातील काळखेडे ग्राममहसूल अधिकार्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. विक्रमसिंग भगवानसिंग गोठवाल (33, श्रीराम कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, धुळे एसीबीने गेल्या दोन महिन्यात धुळे तालुक्यातील चौथ्या तलाठ्याभोवली कारवाईचा पाश आवळला आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे 43 वर्षीय पुरुष आहेत. त्यांनी काळखेडे, ता.धुळे येथे त्यांच्या मुलाच्या नावाने शेतजमीन खरेदी केली असून खरेदी खतावरून मुलाचे नाव सातबारा उतार्यावर लावण्यासाठी प्रकरण ग्राममहसूल अधिकारी गोठवाल यांच्याकडे सादर केले होते. शेजजमिनीवर नाव लावण्यासाठी 16 रोजी गोठवाल यांची भेट घेतल्यानंतर सुची क्रमांक दोन जोडून अर्ज दिला व मात्र तक्रारदाराकडे एक हजारांची लाच मागण्यात आल्याने या संदर्भात धुळे एसीबीकडे 16 रोजी प्रत्यक्ष तक्रार देण्यात आली व त्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला. बुधवार, 18 रोजी दुपारी गोठवाल याने लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, एएसआय राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, रामदास बारेला, प्रशांत बडगुजर, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
