भुसावळात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घ्यावा : रजनी सावकारे
भुसावळ (दि. 14 नोव्हेंबर 2026) : महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासह त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भुसावळ नगरपालिका व आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण योजनेंतर्गत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील गरुड प्लॉटमध्ये आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांनी आत्मनिर्भर होण्यावर द्यावा भर
ब्युटी पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे महिलांनी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्यावर भर द्यावा, असे मत महिला व बालकल्याण सभापती शोभा रणधीर इंगळे यांनी यावेळी व्यक्त केले. आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका मीना लोणारी, अर्चना सातादिवे, सीमा नरवाडे, सोनल महाजन, सविता मकासरे, दीपाली बर्हाटे, वैशाली शेतवाल, वैशाली मराठे आदी मान्यवर उपस्थित होत्या.
महिला सबलीकरणाला चालना
या प्रशिक्षण कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाचे मूलभूत ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. या कौशल्याच्या बळावर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतील. अशा उपक्रमांमुळे महिला सबलीकरणाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी आस बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांना सक्षम बनविणे आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भुसावळ नगरपालिका व आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण योजनेंतर्गत मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
