धुळे जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ : मोहिमेत दरोड्याच्या तयारीतील कुख्यात टोळी मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात
47 हिस्ट्रीशीटरांची तपासणी : एमव्ही अॅक्टचे 59 गुन्हे तर जुगाराचे सहा गुन्हे दाखल
धुळे (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : धुळे जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत राबविलेल्या विशेष मोहिमेत दरोड्याच्या तयारीत असलेल्या वाहनातील टोळीला लक्ष्य करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई केल्याने दरोड्याचा डाव उधळला गेला. पोलिसांनी या शिवाय 47 हिस्ट्रीशिटरांची तपासणी केली तर एमव्ही अॅक्टचे 59 गुन्हे दाखल करीत सहा जुगार अड्ड्यांवरही कारवाई केली.
अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ
धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 20 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकांना कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.
अशी झाली कारवाई
मोटार व्हेईकल अॅक्टद्वारे 59 केसेसच्या माध्यमातून 30 हजार 900 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तर अवैध हातभट्टी दारूविरोधात 18 गुन्हे दाखल करून 60 हजार 640 रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू, रसायन आणि साहित्य जप्त करण्यात आले.
जुगार अड्ड्यांवर कारवाई करत सहा गुन्हे दाखल करीत सात हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 122 अंतर्गत तीन गुन्हे दाखल करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली तर कलम 124 अंतर्गत दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली.
हिस्ट्रीशीटर तपासले
हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. 47 हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले तर 52 वॉण्टेड आरोपींची तपासणी करण्यात आली. 43 मोकळ्या मैदांनाची तपासणी करण्यात आली व 87 बार, ढाबे, हॉटेल, लॉजिंग आणि गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली. 9 नदीकिनार्यांच्या भागातही पोलिसांनी तपासणी केली. या कारवाईत 31 पोलीस अधिकारी आणि 82 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
संशय बळावल्याने उधळला डाव
मोहाडी निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अशोक पायमोडे, अंमलदार प्रेमराज पाटील, बापूजी पाटील, मयूर थोरात, भूषण महाजन, ललिता मराठे, प्रकाश लोहार, शशिकांत वारके आदींचे पथक गस्तीवर असताना 20 रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सुभाषचंद्र पेट्रोल पंपालगत रानमळा रस्त्याने चारचाकी वाहन लाईट बंद करून येत असल्याचे दिसताच पथकाने बॅटरी दाखवून थांबण्याचा इशारा केला. वाहन चालकाने भर रस्त्यात वाहन सोडून पोबारा केला.
दरोड्यापूर्वीच टोळी मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यात हिस्ट्रीशीटर हमीद अब्दुल रशीद अन्सारी (33, चांदतारा चौक, मौलवीगंज, धुळे), शकील शेख करीम शेख (45, बाबा नगर, नटराज टॉकीजजवळ, धुळे), समीर शाह जाकीर शाह (20, अंबिकानगर फारुक गिरणीजवळ, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी पसार साथीदारांमध्ये गनी (अंदरवाली मशीदजवळ, देवपूर, धुळे) व जुबेर अन्सारी (ताशा गल्ली ग.नं.5, धुळे) यांचा समावेश असल्याचे सांगितले.
दरोड्याचे साहित्य जप्त : आरोपी कुख्यात
आरोपींच्या ताब्यातून नॉयलॉन दोर, मिरची पावडर, लोखंडी टॉमी, लोखंडी कटर, लहान रेडीयम कटर, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, पकड, फोर वे स्पॅनर, तीक्ष्म चॉपर, चार मोबाईल, फास्टटॅग कार्ड व आठ हजार 300 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हमीद अब्दुल रशीद अन्सारी, शकील शेख करीम शेख व समीर शाह जाकीर शाह हे कुख्यात असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, पाचही आरोपीविरोधात मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार संदीप कदम करीत आहेत.
