बॅग चोरीचे 35 गुन्हे दाखल असलेली परभणीतील महिलांची टोळी भुसावळ आरपीएफच्या जाळ्यात
ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत कारवाई ; रिवा-हडपसर रेल्वेच्या स्लीपर कोचमधून केली बॅगांची चोरी
भुसावळ (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणार्या ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाई करत चोरीच्या ट्रॉली बॅगसह तीन परभणी जिल्ह्यातील तीन महिलांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. कुख्यात असलेल्या या महिला आरोपींविरोधात चोरी प्रकरणात 30 ते 35 गुन्हे राज्यभरात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सुनीता विठ्ठल भोसले (41, कमलापूर, परभणी), राजश्री राहुल भोसले (29, लोहगांव रोड, सखला प्लाट, परभणी), लकजरी अजमास पवार (19, कमलपूर, परभणी) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. गुन्हा दाखल करीत तिन्ही महिलांना लोहमार्ग पोलीस (जीआरपी) भुसावळ यांच्या स्वाधीन करण्यात आले.
रिवा-हडपसर एक्स्प्रेसमध्ये केली चोरी
गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी प्रवासी पीयूष अग्रवाल हे रेल्वेगाडी क्रमांक 20152 रीवा-हडपसर एक्स्प्रेसने गोंदिया ते हडपसर असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर त्यांच्या एस-5 डब्यातील सफारी कंपनीची ट्रॉली बॅग चोरीला गेली. या बॅगेत 20 हजार रुपये रोख आणि अंदाजे 30 हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 50 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत त्यांनी रेल्वे मदत प्रणालीवर तक्रार नोंदविली.
तक्रारीची दखल घेत संबंधित रेल्वेगाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतरच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये तीन संशयित महिला चोरीची ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसून आल्या. त्यानंतर सीपीडीएस पथकातील एएसआय महेंद्र कुशवाहा, हेड कॉन्स्टेबल इमरान खान, हेड कॉन्स्टेबल जोगेंद्र, कॉन्स्टेबल योगेंद्र वानखेडे आणि स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या महिला आरक्षक संजना साहू यांना गुरुवारी सायंकाळी चार वाजता भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील महिला प्रतीक्षालयात सीसीटीव्ही फुटेजमधील तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून महिला आरक्षकाच्या उपस्थितीत अधिक चौकशी करण्यात आली.
मुद्देमाल जप्त
यावेळी सुनीता भोसले हिच्याकडील आकाशी निळ्या व पिवळ्या रंगाची सफारी कंपनीची ट्रॉली बॅग दोन महिला पंचांच्या उपस्थितीत तपासण्यात आली. त्यामध्ये 10 शर्ट, 4 स्वेटर, 4 टी-शर्ट, 3 अंडरपॅन्ट, 5 पॅन्ट, 2 कुर्ते तसेच तीन हजार 200 रुपये रोख असा मुद्देमाल आढळून आला. चौकशीत तिन्ही महिलांनी संगनमताने रीवा-हडपसर एक्स्प्रेसच्या स्लीपर डब्यातून ट्रॉली बॅग चोरी केल्याची माहिती दिल्याचे आरपीएफने सांगितले. त्यानंतर तिन्ही महिलांना पुढील कारवाईसाठी जीआरपी भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी जीआरपीमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
