जमीन व्यवहारातून पाचोरा तालुक्यात कन्नडच्या व्यावसायिकाचा खून ; मृतदेह बहुळा धरणात फेकला : दोघांना अटक
वर्ग दोनची जमीन वर्ग एक झाल्यानंतर आरोपींची नजराणा भरण्यावरून बदलली नियत : अपहरणाचा तपास पोहोचला खुनावर
पाचोरा (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : वर्ग दोनच्या जमिनीचे वर्ग एकमध्ये रुपांतर झाल्यानंतर आरोपींची नियत बदलल्याने त्यांनी कन्नड तालुक्यातील व्यावसायीकाचे अपहरण करीत त्यांचा खून केला व मृतदेह बहुळा धरणात फेकला. धक्कादायक प्रकाराची पाचोरा पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उकल करीत दोन आरोपींना अटक केली आहे. डॉ.संजय मनोहर तेली (52, रा.कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. खून प्रकरणी जमीन मालक राहुल धर्मराज पाटील व त्याचा सालदार संजय भील (गोराडखेडा) यांना पोलिसांनी अटक केली.
जमीन व्यवहाराचा वाद
प्राथमिक माहितीनुसार, डॉ.संजय मनोहर तेली (52, रा.कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायही करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील यांच्याशी दोन एकर जमिनीचा एक कोटी दोन लाख 50 हजार रुपयांचा व्यवहार ठरला होता. या व्यवहारापोटी डॉ.तेली यांनी राहुल पाटील यांना 80 लाख रुपयांचा बयाणा दिला होता.
वर्ग दोनची जमीन वर्ग एक : शेतात वादानंतर डोक्यात मारला रॉड
सूत्रानुसार, 17 नोव्हेंबर रोजी डॉ.तेली हे कन्नड येथून चारचाकी वाहनाने मुलीसोबत निघाले होते. मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये सोडल्यानंतर ते पिंपळगाव हरेश्वर व तेथून सांगवी येथे रक्कम घेण्यासाठी पोहोचलेा. 18 नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील, त्यांचा सालदार संजय भील सोबत ते शेतात गेले. यावेळी वर्ग दोनची जमीन वर्ग एक झाल्यानंतर नजराण्याची रक्कम वाढल्याने ती शेतकर्याने भरावी यावरून वाद वाढला. टोकाच्या वादात संशयीत राहुलने लोखंडी रॉड डॉ.तेली यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकला. .
मिसिंग प्रकरणाचा तपास पोहोचला खुनावर
खुनानंतर राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून जवळील बहुळा धरणात फेकला तर डॉ.संजय तेली हे 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात मिसिंग (अपहरण) तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी एक लाख 21 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
आरोपींनी दिली खुनाची कबुली
या प्रकरणाचा तपास करताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी संशयित राहुल धर्मराज पाटील व त्याच्या सालदाराला ताब्यात घेतले. दोघांनी संगनमताने खून केल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलीस उपअधीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेहत.
