भुसावळ तालुक्यातील 28 अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट अंगणवाडीचा दर्जा ; मंत्री संजय सावकारेंच्या पाठपुराव्यातून 46 लाखांचा निधी मंजूर


भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील 28 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण होणार असून, बालकांना आधुनिक शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

28 अंगणवाडी केंद्राचा समावेश
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. या निर्णयात भुसावळ तालुक्यातील एकूण 28 अंगणवाडी केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक स्मार्ट अंगणवाडी किटची किंमत जीएसटीसह एक लाख 64 हजार 560 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील 28 अंगणवाड्यांसाठी एकूण 46 लाख सात हजार 680 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यातील या गावांच्या अंगणवाड्यांचा समावेश
भुसावळ तालुक्यातील कंडारी, खडके, जाडगाव, निंभोरा बु.॥, सावतर, सुसरी, कनाळे बु., किन्ही, साकरी, भिलमळी, चोरवड, गोजोरे, कु-हा पा., खेर्डी, महादेव माळ, दर्यापूर, काहूरखेडा, मानपूर, तळवेल, गोंभी, वराडसीम आणि फुलगाव या गावांतील अंगणवाडी केंद्रांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज होणार अंगणवाड्या
स्मार्ट अंगणवाडी किटच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये आरोग्य, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाशी संबंधित विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे अंगणवाड्यांमधील शैक्षणिक वातावरण अधिक दर्जेदार आणि बालस्नेही होण्यास मदत होणार आहे.

बालकांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना
अंगणवाडी केंद्रांमार्फत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या जातात. स्मार्ट अंगणवाडी उपक्रमामुळे बालकांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, स्वच्छ व सुरक्षित वातावरण तसेच दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !