जागतिक बालविवाह प्रतिबंध दिनानिमित्त खडका गावात जनजागृतीपर प्रभात फेरी
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : संविधान दिनासह 27 नोव्हेंबर 2026 रोजी येणार्या जागतिक बालविवाह प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून भुसावळ तालुक्यातील खडका गावात जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीतून भारतीय संविधानाचे महत्त्व आणि बालविवाह रोखण्याबाबत समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्यात आला.
फलकांनी वेधले लक्ष
प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध जनजागृतीपर फलक आणि बॅनर्स घेऊन गावातून शिस्तबद्ध रॅली काढली. ‘संविधान हमारा, सबसे प्यारा’, ‘भारत माता की जय’ तसेच बालविवाह मुक्तीचे विविध घोषवाक्य देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. संविधानातील मूल्ये जपणे आणि बालकांचे हक्क व शिक्षण अबाधित राखून बालविवाहाला आळा घालणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सहकारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. दीपाली सुनील हिवाळे आणि सुनील जगन हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षक व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे ही प्रभात फेरी यशस्वी व प्रेरणादायी ठरली.
