रावेरात कंत्राटी कामगारांच्या न्यायलढ्याला अखेर यश ! कामगारांच्या प्रश्नांची तहसीलदारांकडून दखल

आनंद बाविस्कर यांच्या अन्नत्याग आमरण उपोषणाची यशस्वी सांगता


रावेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : रावे नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनासह विविध न्याय्य मागण्यांसाठी 16 नोव्हेंबर 2026 पासून निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची तहसीलदारांनी गांभीर्याने दखल घेत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन कामगारांना धनादेशच्या माध्यमातून थकित वेतन व ठेकेदाराच्या ताब्यात असलेले कामगारांचे कोरे चेक कामगारांच्या ताब्यात देण्यात आले. नव्याने होणार्‍या कंत्राटामध्ये कामगारांना प्राधान्याने सामावून घेण्याचे पत्र दिल्यामुळे 25 नोव्हेंबर रोजी शुरू असलेले अमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

आंदोलनानंतर प्रश्न मार्गी
या आंदोलनामुळे कामगारांच्या वेतनाचा प्रश्न आणि त्यांच्यावर होत असलेल्या कथित आर्थिक शोषणाचा विषय प्रशासनाच्या पातळीवर ऐरणीवर आला. आंदोलनादरम्यान विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असताना, भ्रष्टाचार व अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित घटकांचा दबाव निष्फळ ठरल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आनंद बाविस्कर यांनी रावेर नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाचे मानले आभार
या आंदोलनाला सहकार्य करून कामगारांच्या प्रश्नांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी तहसीलदार, पोलीस प्रशासन व आंदोलना दरम्यान गोपनिय विभागाचे हिरालाल गुमळकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे प्राण सुरक्षीत आहेत तसेच आंदोलनाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणार्‍या सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेला हा लढा अखेर यशस्वी ठरल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !