जळगावात उद्या व परवा ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व 2 चे आयोजन

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि पालकशाळा यांचा संयुक्त उपक्रम ; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य


जळगाव (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व 2’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे.

उद्या व परवा उपक्रम
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होताना बालचमूंना आणि त्यांच्या पालकांना एक अनोखा व भन्नाट अनुभव देण्यासाठी जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व 2’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा दोन दिवसीय महोत्सव येत्या शनिवार, 28 आणि रविवार, 29 नोव्हेंबर 2026 रोजी दररोज सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव येथील भाऊंचे उद्यान (अ‍ॅम्फी थिएटर) येथे होणार आहे.

यंदाच्या महोत्सवात दर्जेदार बालचित्रपटांसोबतच मनोरंजनाची दुहेरी मेजवानी असणार आहे. राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अद्भूत आणि अविश्वसनीय जादूचे प्रयोग हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक जादूचे प्रयोग बालचमूंसाठी पर्वणीच ठरणार आहेत.
आजच्या धावपळीच्या युगात पालक आणि पाल्यांनी एकत्र बसून निखळ आनंद लुटत आपले बालपण पुन्हा अनुभवावे, या उदात्त हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बालविश्वाशी निगडित दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपटांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून, जळगाव शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, बालचमूंनी आणि पालकांनी आपल्या तारखा राखून ठेवत या चित्रपट व जादू महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !