मेहुणबारे विमा घोटाळा प्रकरण : एरंडोलच्या पाटील कुटूंबातील मृतांची संख्या पाचवर : संशयीत चालकाला जळगाव गुन्हे शाखेकडून अटक


जळगाव (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : 50 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या अपघाताचा बनाव प्रकरणात दाखल गुन्ह्यातील संशयीत महिलेसह दोघांची गुजरातमध्ये तलावात फेकून हत्या करण्यात आली होती. या घटनेत कुटूंबातील तब्बल पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू ओढवला आहे तर एक बालक सुदैवाने बचावला आहे. संबंधित कुटूंबाला रोजगार देण्याचे आमिष दाखवून गुजरातमध्ये वाहनाद्वारे नेणार्‍या चालकाला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. चालक दयानंद भदाणे उर्फ खंड्या असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पारोळा येथून आरोपीला अटक करीत गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.

बनावट क्लेम लाटण्यासाठी दावा : दहा जणांविरोधात गुन्हा
राजेंद्र शालिंदर जाधव (रा.पाथीमांगे, ता.मालेगाव) यांचा 23 फेब्रुवारी 2024 रोजी नैसर्गिक मृत्यू झाला मात्र यानंतर आरोपींनी संगनमताने योजना आखत जाधव जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावावर विविध विमा कंपन्यांच्या पॉलिसी काढल्या. त्यानंतर 19 एप्रिल 2025 रोजी दहिवद फाट्याजवळ अपघात झाल्याचा बनाव रचून जाधव यांचा मृत्यू अपघातात झाल्याचे दाखवण्यात आले. या आधारावर श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीसह इतर 10 विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईचा दावा सादर करण्यात आला. पोलीस चौकशीत सर्व षडयंत्र उघड होताच विमा कंपनीचे अधिकारी किरण रावसाहेब शिंदे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नितेश हिंमत पाटील (रा.एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा.जुवार्डी, ता.भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा.एरंडोल), कविता संजय पाटील (रा.एरंडोल, जि.जळगाव), हवालदार रवींद्र एकनाथ बतीसे (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे), वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबेळकर, खासगी एजंट प्रवीण मयाराम पाटील (रा.पारोळा), नाईक महेंद्र प्रकाश पाटील (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे), हवालदार सचिन अशोक निकम (तत्कालीन नेमणूक मेहणुबारे) व सुनील अशोक निकम (तत्कालीन नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कविता पाटील यांनी क्लेम मागे घेतला तर फिर्यादीच्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून 10 लाख रुपये लुबाडण्यात आल्याचे तपासात समोर आले.

कट रचत तलावात फेकल्याचा संशय : पाच जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले पाटील कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी संशयीतांच्या सांगण्यावरून रोजगाराच्या शोधार्थ चारचाकी वाहनाने गुजरातच्या सुरतकडे निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचल्यानंतर दुसर्‍या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचे वाहन अडवून कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढून कालव्याच्या खोल पाण्यात फेकले. या घटनेत नितीन ऊर्फ भुरिया पाटील, कविता पाटील आणि एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला तर नंतरच्या शोधमोहिमे प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील यांचाही मृतदेह हाती आला. 13 वर्षीय बालक पाईपाला धरून बाहेर आल्यानंतर त्याने जवळच्या हॉटेल चालकाला घटना सांगितल्यानंतर हत्याकांडाचा उलगडा झाला.

लवकरच घटनाक्रमाचा होणार उलगडा
मयत या प्रकरणातील संशयीत असल्याने व तिच्या वतीने क्लेम दाखल करण्यात आल्यानंतर प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून हत्याकांडाचा हा कट रचण्यात आल्याचा यंत्रणेला संशय आहे. लवकरच या प्रकरणात पर्दाफाश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !