अमळनेर तालुक्यातील खून प्रकरण : पसार त्रिकूटाला चिंचणी येथून बेड्या


अमळनेर (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील नगाव येथील डंपरखाली चिरडून एकाला ठार मारल्याप्रकरणातील तीन पसार आरोपीना पोलिसानी सातारा जिल्ह्यातून चिंचणी येथून अटक करण्यात आली. केली आहे. आरोपीना न्यायालयाने 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण ?
31 ऑक्टोबर रोजी नगाव बुद्रुक येथील शरद रतन पाटील हे आपल्या मित्रांसोबत नांद्री बसस्थानक जवळ उभे असताना संशयीत विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी यांनी चारचाकी वाहन जोरात आणून कट मारला. तेथे त्यांचे आपसात वाद झाले. त्यांनतर पातोंडाकडून येत असलेल्या डंपर (क्रमांक एच.आर. 37 डी.8957) वरील चालक भरत सुभाष पाटील हा देखील खाली उतरून शिविगाळ करू लागला. भांडण वाढल्यानंतर तिघांनी चालक भरत याला चिथावणी देऊन हा आमच्याविरुद्ध साक्ष देतो म्हणून यांच्या अंगावर डंपर चालव, असे सांगितल्याने भरतने डंपर अंगावर चालवल्याने शरद याचे पाय चिरडले गेले. उपचारासाठी नेताना शरदचा रस्त्यात मृत्यू झाला होता.

खून प्रकरणात चौकडीविरोधात गुन्हा
चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भरतला जागेवर अटक करण्यात आली तर विपूल, मयुर व सागर तिघे पसार झाले. आरोपिना अटक करण्यासाठी नगाव ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनला धारेवर धरले होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला असता त्यांना तिन्ही पसार आरोपी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चिंचणी गावाला असल्याची माहिती प्राप्त झाली. एपीआय गणेश अहिरे आणि पोलीस कॉन्स्टेबल उज्वल पाटील यांनी चिंचणी गावाला जाऊन आरोपींवर झडप घातली. हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील, सिद्धांत शिसोदे, योगेश बागुल यांना मदतीसाठी पाठवण्यात आले. आरोपींना अमळनेर येथे आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !