मटक्याचा धंदा चालू देण्यासाठी 15 हजारांची लाच : दोघे पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात
नाशिक (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : मटक्याचा धंदा सुरळीत चालू देण्यासाठी सुरूवातीला 50 हजारांची लाच मागून 25 हजारात तडजोड करीत 15 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्या सुरगाणा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचार्यांना नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. रमेश वाल्मिक चव्हाण (37, कृष्णनगर, कानडे बिल्डींग, सुरगाणा) व जगदीश जानू घुटे (37, गट क्रमांक 100, सुरगाणा) अशी अटकेतील आरोपी कर्मचार्यांची नावे आहेत.
तडजोडीनंतर 25 हजारांवर सहमती
तक्रारदाराचा मटक्याचा धंदा सुरळीत चालू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी आरोपींनी 15 ऑक्टोबर रोजी सुरगाणा बसस्थानकावर सुरूवातीला 50 हजारांची लाच मागितली व 25 हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिली मात्र पडताळणीत आरोपींनी 15 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सापळ्याच्या दिवशी आरोपींना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच आरोपींना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. हितीनुसार, संबंधित प्रकरणात 40 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले. या लाच मागणी प्रकरणात दुसर्या आरोपीनेही प्रोत्साहन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वात हवालदार प्रफुल्ल माळी, हवालदार विलास निकम, प्रभाकर गवळी, समीर शेख आदींच्या पथकाने केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचार्याने लाचेची मागणी केल्यास तातडीने विभागाशी संपर्क साधावा.
