वर्षभरापूर्वीच हरपले पितृछत्र : तामसवाडीतील विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
एरंडोल (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : भरधाव वेगातील दोन दुचाकी धडकून झालेल्या अपघातात तामसवाडीतील रहिवासी व फार्मसीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावर समर्थ बैठक हॉलनजीक शुक्रवारी दुपारी 12 वाजता अपघात घडला. जयेश अनिल पाटील (19) असे ठार झालेल्याचे नाव असून दुसर्या दुचाकीवरील सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील (5) हे गंभीर जखमी झाले आहेत.
दोन दुचाकी धडकल्या
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसीच्या दुसर्या वर्षात शिकणारा जयेश अनिल पाटील हा पेपर सुटल्यानंतर मित्र निखील दिनेश पवार व सुधाकर कुंभार यांच्यासह दुचाकीवरून (एम.एच. 19 ई.एच.6379) एरंडोलच्या दिशेने येत असताना त्याचवेळी सीआरपीएफ जवान सचिन नाना पाटील हे कुणाल जिजाबराव पाटील (21) व दिगंबर तुकाराम पाटील (20) यांच्यासह दुचाकीवरून (एम.एच.19 सी.एम.2922) आपल्या गावी तुराटखेडे येथे जात होते. समर्थ बैठक हॉलजवळ दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात जयेश पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेले जवान सचिन पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवले.
दरम्यान, मृत जयेश पाटील हा तामसवाडी (ता. पारोळा) येथे आपल्या मामाकडे राहून शिक्षण घेत होता. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्याचे मामाच त्याचा सांभाळ व शिक्षणाचा खर्च करीत असल्याची माहिती मिळाली.
