यावलमध्ये खाजगी डॉक्टरांकडून नागरीकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात


यावल : शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टर्स यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी नागरीकांची आरोग्य तपासणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशान्वये कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील खाजगी व्यवसायीक डॉक्टरांची बैठक यावल नगर परीषदेच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली. मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांच्या उपचार पद्धतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा
शहरातील नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येवून आठवड्यातील तीन दिवस शुक्रवार, सोमवार आणि बुधवार या दिवशीही आरोग्य शिबिरे बोरावल गेट परीसर जिल्हा परीषद मराठी शाळा, बालसंस्कार विद्यामंदीर शाळा, इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल, चोपडा रोड या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. या शिबिरात डॉ.तुषार फेगडे, डॉ.पी.एस.पाटील, डॉ.युवराज चौधरी, डॉ.प्रवीण पाटील, डॉ.सतीष अस्वार, डॉ.श्रीकांत महाजन हे सर्व बोरावल गेट जिल्हा परीषद शाळा तर बालसंस्कार विद्यामंदीर शाळा येथे डॉ.मनोज वारके, डॉ.रमेश पाचपोळ, डॉ.योगेश गडे, डॉ.चंदन पाटील, डॉ.अभय रावते, इंदीरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कूल, चोपडा रोड येथील शिबिरात डॉ.रीजवान खान, डॉ.शेख मुक्तार शेख मुसा व डॉ.शेख वसीम शेख हनीफ हे या शिबिराच्या माध्यमातून नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची सुरवात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर व नगरपरीषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शहरातील सर्व नागरीकांनी या शिबिरात आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या शिबिरात दोनशेहुन अधिक नागरीकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !