रावेर बाजार समितीला कोरोनाचा फटका : 50 लाखांचे नुकसान
रावेर : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे रावेर बाजार समितीचे तब्बल 50 लाखाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका कर्मचार्यांना देखील सोसावा लागत आहे. कोरोना व्हायरसने सर्वच क्षेत्रातील आर्थिक आणिबाणी आली असून यात रावेर कृषी उपन्न बाजार समितीदेखील सुटलेली नाही. रावेर व सावदा येथील दैनंदीन गुरांचा बाजार 22 मार्चपासून बंद असल्याने बाजार समितीला तब्बल 50 लाखांचे नुकसान झाले आहे.
बाजार समितीत विकास कामे थांबली
लॉकडाऊनपासुन बाजार समितीचे उत्पन्न बंद असल्याने याचा परीणाम म्हणून कृषी उपन्न बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे शिवाय विविध पदावर काम करीत असलेल्या 23 कर्मचार्यांच्या पगारावरदेखील परीणाम झाला आहे. मोठे आर्थिक नुकसान बाजार समितीचे झाले असल्याचे कृषी उपन्न बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी सांगितले.
जिल्हाधिकार्यांचे बाजार सुरू करण्याचे आदेश
पाच महिन्यांपासून बंद असलेला सावदा व रावेर येथील गुरांचा बाजार शासनाने घातलेल्या अटी-शर्ती नुसार शुक्रवार, 31 पासुन सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे. त्यामुळे सावदा व रावेर बाजार सुरू होणार असल्याने बाजार समितीची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

