ऑक्सीजन सुविधेमुळे रुग्णांचे वाचणार प्राण : जिल्हाधिकारी


भुसावळ : भुसावळातच ऑक्सिजनची व्यवस्था झाल्याने रुग्णांना भुसावळातच ऑक्सिजन मिळणार असून यामुळे रुग्णांचे प्राण वाचतील. भविष्यात हे
रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल होईल, यासाठी सामाजिक संघटनांनी सहकार्य केल्यास विकासकामांना गती येते, असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथे व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात 40 बेडला ऑक्सीजन प्रणाली लावण्यात आली असून त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी त्यांच्या हस्ते. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार दीपक धीवरे, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष संदीप जोशी, सुधाकर सनांसे, डॉ.देवर्षी घोषाल आदी उपस्थित होते.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
सूत्रसंचालन जीवन महाजन तर प्रस्तावना वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी केले. आभार रोटरीतर्फे सोनू मांडे तर ग्रामीण रूग्णालयातर्फे ज्योती गुरव यांनी
मानले. यशस्वीतेसाठी रोटरी ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष सुधाकर सनंसे, सचिव संजय भटकर, रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा तसेच दोन्ही क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरीच्या उपक्रमामुळे रुग्णांचे वाचणार प्राण
आमदार संजय सावकारे म्हणाले की, कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन व्यवस्था ही अत्यंत महत्वाची प्रणाली रूग्णासाठी ठरणार आहे. रोटरीने घेतलेल्या सामाजिक कार्यामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचणार आहे. ग्रामीण रूग्णालयास रोटरीच्या माध्यमातून टेबल, खुर्च्या पुरविल्या जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी काही सुविधा, उपकरणे लागली तर ती आमदार निधीतून दिली जातील. ग्रामीण रुग्णालयास संरक्षण भिंतीची, ग्रीलची गरज आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मी भेटून त्यास मंजूरी मिळवून आणेल, असेही ते म्हणाले.

सुशीला सावकारे यांनी दिली लाखाची देणगी
ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आलेल्या मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीच्या कामासाठी आमदार संजय सावकारे यांच्या आई सुशीला वामन सावकारे यांनी
त्यांच्यातर्फे एक लाख रुपयांची मदत या कामासाठी रोटरीला दिली आहे. मी शिक्षिका असून माझ्या निवृत्ती वेतनातून समाजासाठी भरीव कार्य करण्यासाठी ही देणगी देत असल्याचे त्यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !