साकेगावातील सासु-सुना वाघूर नदीच्या पुरात वाहिल्या


सासुचा मृतदेह आढळला : बेपत्ता सुनेचा आपत्कालीन पथकाकडून शोध सुरू

भुसावळ : वाघूर नदीपात्रातून शेतात जात असलेल्या सासू-सुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहिल्याची घटना तालुक्यातील साकेगाव येथे गुरुवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शोध कार्यादरम्यान सिंधूबाई अशोक भोळे (65) यांचा मृतदेह सुमारे तीन किलोमीटर अंतरावर झुडूपांमध्ये आढळला तर त्यांच्या सून योगीता राजेंद्र भोळे (35) या अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

साकेगावात हळहळ
सिंधूबाई व त्यांची सून योगीता या गुरुवारी पहाटे शेतात जाण्यासाठी निघाल्या असता वाघूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे दोघेही वाहून गेल्या. याबाबतचे वृत्त कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, जगदीश भोई, विजय पोहेकर, सरपंच व ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर सिंधूबाई यांचा मृतदेह आढळल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला तर त्यांच्या सून योगीता अद्यापही बेपत्ता आहेत. दुपारी आपत्कालीन पथक दाखल झाल्यानंतर बेपत्ता सुनेचा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला आहे. सिंधुबाई यांच्या पश्‍चात मुलगा आहे तर योगीता यांनादेखील मुलगा व मुलगी असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !