भुसावळात पीसीनुसार समाधान शिबिराचे करावे आयोजन
वीज बिल तक्रारदारांशी आता थेट संवाद साधाणार : प्रा.धीरज पाटील
भुसावळ : वाढत्या वीज बिलांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही तसेच वीज बिले वाढीव येत असून वीज ग्राहक हैराण झाले आहेत. परीणामी यावर एक छोटा उपाय म्हणून आता वीज बिल तक्रारदारांशी थेट संवाद साधला गेला पाहिजे म्हणून शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्रा.विनोद गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नबी पटेल, फिरोज तडवी, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना भुसावळात पीसीनुसार समाधान शिबिराचे आयोजन करावे, अश्या मागणीचे निवेदन दिले आहे.
शिवसेना लोकांशी थेट संवाद ठेवणार
गेली अनेक दिवस शिवसैनिक वाढीव वीज बिल विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे करत आहे. हजारो रुपयांची अनेक ग्राहकांची देयके दुरुस्त करण्यात सेनेच्या पदाधिकार्यांना यश मिळवले असून नुकतेच वीज बिल केंद्रावर प्रा.धीरज पाटील, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्रा.विनोद गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील यांनी लोकांशी थेट संवाद साधला. अनेक वृद्ध नागरीक या रांगेत तक्रार घेऊन उभे होते. जिथे महिन्याला पाचशे रुपये बिल येत होते. तिथे महिन्याला 1500 ते 2000 रुपये वीज बिल आले आहे. त्यात 1 एप्रिल 2020 पासून महावितरणने वीज बिलात वाढ केलेली आहे. शिवसेना लोकांशी थेट संवाद सप्ताह हा उपक्रम सुरू ठेवणार आहे. या अंतर्गत दररोज वेगवेगळ्या वीज बिल केंद्रांवर जाऊन लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणार असल्याची माहिती संघटक प्रा.धिरज पाटील यांनी दिली.
शिबिरातून ग्राहकांना दिलासा मिळणार
लॉकडाउनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरीकांना आता वीज दरवाढीचा शॉक महावितरणने दिलेला आहे. समाधान शिबिरातून वाढीव वीज बिलांबाबत आता नागरीकांना तक्रार करता येईल. भुसावळ शहरातील वीज ग्राहकाला दिलासा देण्याचा उद्देश या शिबिरातून साध्य होईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे होते.

