अवकाश संशोधन कार्यासाठी टेलिकॉम तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व
प्रा.दीपक खडसे : स्व.डॉ.विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
भुसावळ : भारताने स्व-कष्टावर अवकाश संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती नक्कीच उल्लेखनीय अशी आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला एक महासत्ता म्हणून ओळखले जाते कारण भारतातील कुशल मनुष्यबळाला, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व प्रगत टेलिकॉम तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे, असे प्रतिपादन सॅटेलाईट विषय तज्ञ प्रा.दीपक खडसे यांनी केले. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक स्व.डॉ.विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ.साराभाई यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील टेलिकॉम विषयाच्या प्राध्यापकांनी आपापले मत मांडले. इतर प्राध्यापकांनी व विद्यार्थी ऑनलाइन सहभाग नोंदवला.
टेलिकॉम तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व
प्रा.खडसे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताने अनेक प्रणाली विकसीत केल्या. सध्या कॅनडा, अमेरीका, जपान आणि ऑस्ट्रेलिया व इतर राष्ट्रांना मागे टाकत भारतीय अभियंत्यांनी अंतराळ विभागात चमकदार कामगिरी बजावली आहे आणि यापुढेही बजावतीलच. आधुनिक अवकाश संशोधन कार्यासाठी टेलिकॉम तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे असेही प्रा.खडसे म्हणाले.
अंतरीक्ष क्षेत्रात मोठे बदल
येत्या काही दिवसांत भारतातील अंतरीक्षच्या क्षेत्रातही मोठा बदल होऊ शकतो. भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) असे जाहीर केले की, आता खाजगी कंपन्या रॉकेट व उपग्रहदेखील बनवू शकतात. भारत सरकारने सुद्धा अंतराळासंदर्भातील सर्व कामांमध्ये खाजगी क्षेत्रातील सहभागास मान्यता दिली आहे. यामुळे केवळ या क्षेत्राला गती मिळणार नाही तर भारतीय उद्योग देखील अंतरीक्ष अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील यासह तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.सुलभा शिंदे यांनी सांगितले.
अंतराळ संशोधन क्षेत्रात नोकरीची संधी : प्रा.निलेश निर्मल
गेल्या कित्येक वर्षांपासून खाजगी कंपन्या इस्रोला कंपोनेंट्स व इतर वस्तू पुरवित आहेत. आता अंतराळ संशोधन क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या अभियंत्यांना नोकरी मिळण्याची जास्त शक्यता असून या व्यतिरिक्त या क्षेत्रात वाढ होण्याचीही चांगली शक्यता आहे. दरम्यान, अमेरिका, चीन आणि युरोपच्या बर्याच देशांमध्ये अंतराळ संशोधनात खासगी क्षेत्राचा आधीपासून सहभाग आहे म्हणून तेथील तरुणाईला जास्त रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती प्रा.निलेश निर्मल यांनी दिली.

