भुसावळात २६ ग्रामपंचायतीच्या २८० जागांसाठी ८५१ उमेदवारी अर्ज दाखल
रात्री नऊ वाजेपर्यंत भरले गेले अर्ज, खडक्यात दोन जागा बिनविरोध : कंडारी, दर्यापूर, खडका, कुऱ्हा, पिंप्रीसेकमध्ये सर्वाधिक चुरस
भुसावळ : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या २८० जागांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ८५१ नामनिर्देशन पत्र भरले गेले. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयात जत्रा भरली होती. बुधवारी सर्वाधिक ५२० अर्ज भरले गेले. रात्री नऊ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती. हतनूर, आचेगाव, बोहर्डी खुर्द, बोहडी बुद्रूक, वांजोळा, मांडवेदिगर, भिलमळी आदी ठिकाणच्या अर्जांसाठी उशिरापर्यंत गर्दी कायम होती. ग्रामपंचायत निवडणूकीत बुधवारी होणारी गर्दी पाहता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याचा वेळ दिला होता. दुपारी चारनंतर गर्दी वाढल्याने वेळेपूर्वी आत आलेल्या अर्जदारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु होती. प्रामुख्याने हतनूर, आचेगाव, बोहर्डी खुर्द, बोहडी बुद्रूक, वांजोळा, मांडवेदिगर, भिलमळी या लहान गावांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुथवर गर्दी नऊ वाजेपर्यंत दिसून आली. तालुक्यातील कुऱ्हे पानाचे, साकेगाव, कंडारी, दर्यापूर, खडका, पिंप्रीसेकम – निंभोरा, फेकरी, साकरी आदी मोठ्या गावांमध्ये उमेदवारी अर्जांचे प्रमाण अधिक आहे. रात्री उशिरापर्यंत गावनिहाय उमेदवारी अर्जांच्या स्थितीची प्रशासकिय प्रक्रिया सुरु होती. रात्री उशिरापर्यंत अर्जदारांच्या समर्थकांचीही गर्दी उशिरापर्यंत कायम होती. वेळची मर्यादा वाढवूनही विलंब झाल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली.
गावांचे नावे व कंसात अर्जांची संख्या
कुऱ्हे पानाचे (५१), मन्यारखेडा (१४), काहूरखेडा (२१), खंडाळे (१८), किन्ही (२७), कंडारी (६७), फेकरी (४२), पिंपळगाव बुद्रूक (१९), जोगलखेडा भानखेडा (१६), साकेगाव (५७), साकरी (४४), कठोरा बुद्रूक (१३), कठोरा खुर्द (१४), टहाकळी (२५), जाडगाव (१७), आचेगाव (१९), बोहर्डी बुद्रूक (२०), सुसरी (२२), बेलव्हाय (१८), पिंप्रीसेकम (७६), हतनूर (२४), वांजोळा मिरगव्हाण (२४), शिंदी (१३), खडका (९०), मांडवेदिगर (२४), दर्यापूर (७६)

खडक्यात दोन जागा बिनविरोध
खडका ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये तीन जागा आहेत. यातील एससी जागेसाठी एकमेव विकास धोंडू सपकाळे यांचा अर्ज तर जनरल जागेसाठी यशोधरा देविदास तायडे या दोन्ही उमेदवारांचा एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या तर याच वॉर्डातील ओबीसी महिला या एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक ९० अर्ज खडक्यात दाखल झाले आहे.
—- —-
माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट
ग्रामपंचायत निवडणूकीत ४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. तर दुपारी तीन वाजेनंतर चिन्ह वाटप होईल. माघारीनंतर अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द, शिंदीसह चार ग्रामपंचायतींमधील काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्धा तास वीजपुरवठा खंडीत
तहसील कार्यालयातील गोदामात उमदेवार अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी सव्वाचार वाजेच्या दरम्यान अर्धा तास वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे कर्मचारी व नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्यांना मोबाईलच्या टॉर्चचा वापर करावा लागला. तहसीलमध्ये नवीन मोठे जनरेटर असले तरी ते अद्याप कार्यान्वित झाले नाही. गोदामातील वीजपुरवठा खंडीत झाला तेव्हा मात्र तहसीलमध्ये वीजपुरवठा सुरळीत होता. तांत्रिक बिघाड दुरुस्तीनंतर तो अर्धा तासाने सुरळीत झाला.
बिनविरोधसाठी रोख बक्षीसे
जोगलखेडा- भानखेडा ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास गावाच्या विकासासाठी साकेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभुमी फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी १ लाख ११ हजार १११ रुपये तर माजी सरपंच पंकज पाटील यांनी १ लाख ५१ हजार रुपये विकास निधी देण्याचे जाहिर केले आहे. गावाची निवडूक बिनविरोध झाल्यास ही रक्कम गावाच्या विकासासाठी दिली जाईल. यावेळी जानकिराम कोळी, निवृत्ती कोळी, नारायण कोळी, संजय पाटील, किशोर पाटील, रामसिंग मोरे आदी उपस्थित होते.

