खडक्यात यंदा पॅनलऐवजी स्वतंत्र उमेदवार रिंगणात


माजी आमदार दिलीप भोळे निवडणूकीपासून अलिप्त

भुसावळ : ग्रामपंचायत निवडणूकीमुळे शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे यांचे गाव खडक्यात राजकिय वातावरण तापले आहे. खडक्यात सुरवातीला दोन पॅनलमध्ये सरळ लढत होईल, अशी शक्यता होती. मात्र या निवडणूकीत पॅनल ऐवजी स्वतंत्र निवडणूक लढविण्याकडे अधिक कल आहे. माजी आमदार भोळे हे मात्र प्रकृती अस्वास्थामुळे निवडणूकीपासून अलीप्त आहेत.

 दोन वेळा शिवसेना उमेदवाराला दिली आमदारकी
१५ हजार लोकसंख्या असलेले खडका हे भुसावळ तालुक्यातील मोठे गाव आहे. खडक्यात ८ हजार ७२८ मतदार संख्या असून शहराला लागून असल्याने या गावाचे राजकिय महत्व मोठे आहे. सन १९९० व १९९५ च्या दोन्ही विधानसभा निवडणूकीत या गावाने शिवसेनेचे उमेदवार दिलीप भोळे यांना आमदारकी दिली आहे. यापूर्वी भोळे जिल्हा परिषदेचे पहिले शिवसैनिक सदस्य होते. मात्र या ग्रामपंचायत निवडणूकीपासून ते अलीप्त आहेत. तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी खडका गावाचे योगदानही वारंवार मोलाचे ठरले आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपली. यामुळे यापूर्वीच मतदान होणे गरजेचे हेाते, मात्र कोविडमुळे निवडणूक लांबली. सुमारे २५ ते ३० वर्षापासून खडका गावात दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते. मात्र यंदाच्या निवडणूकीत पॅनल ऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जात आहे. खडक्यातील पाच वार्डामध्ये प्रत्येकी तीन तर एका वॉर्डात दोन जागा आहेत. यात उमेदवारांनी वैयक्तीक पातळीवर एकमेकांना मदत करुन निवडणूक लढविण्याचेही नियोजन केले आहे. मात्र गावात पूर्णपणे पॅनल नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अर्ज भरल्यानंतर माघारीच्या दरम्यान पॅनलची निर्मिती होण्याचीही शक्यता आहे. मात्र तुर्ततरी असे चित्र दिसत नाही.


असे आहेत प्रचाराचे मुद्दे
गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेल्या प्राथमिक सुविधांच यंदाच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. गावात नवीन गार्डन उभारणी, गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आदींच्या मुद्द्यांवरच निवडणूक रंगणार आहे. स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न, सौर उर्जा प्रकल्पाचा पाठपुरावा करुन पूर्णत्वाकडे नेणे, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणी मिळणे आदी मुद्द्यांवरही यंदा उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

एका वॉर्डात बिनविरोधची शक्यता
खडका गावात राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत वेगवेगळ्या वॉर्डातील तीन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र एकाच वॉर्डातील तीन सदस्य बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरु आहेत. मंगळवारपर्यंत वॉर्ड क्रमांक सहामधील तीन जागांसाठी केवळ तीन अर्ज भरले गेले आहेत. एका जागेसाठी तुर्ततरी एकच अर्ज असल्याने या तिन्ही जागा बिनविरोध होतील, अशी चर्चाही गावातील राजकिय वर्तुळात आहे.

मातब्बरांसोबत तरुणही रिंगणात
यंदाच्या निवडणूकीत मातब्बरांसोबत तरुणही रिंगणात उतरले आहेत. या निवडणूकीत दोन, तीन पंचवार्षिक निवडणूकीत निवडून आलेले सदस्यही यावेळी मैदानात आहे. तर दोन, तीन सदस्यांची ही सलग पाचवी टर्म आहे. या मातब्बरांसोबत यंदा तरुण व नवखे उमेदवार देखील रिंगणात उतरले आहेत. तरुणांना यंदा संधी मिळेल काय? कि मातब्बरच आपले गड कायम ठेवतील ते निकालाअंती स्पष्ट होईल.

आजी- माजी धुरीणांचा प्रभाव
खडक्यातील राजकारणावर माजी आमदार दिलीप भोळेंसह अन्य आजीमाजी राजकिय धुरीणांचा प्रभाव आहे. मात्र माजी आमदार भोळे ग्रामपंचायत निवडणूकीत रस घेत नाहीत. या निवडणूकीत मात्र त्यांचे चुलत भाऊ माजी सरपंच चुडामण भोळे अॅक्टिव्ह आहेत. यासोबतच पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रिती पाटील, माजी उपसभापती गोलू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन सरोदे हे प्रभावशाली ठरणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !