गुजरात राज्यात अपघात : किनगावचे दोघे ठार
यावल : तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी चौधरी कुटुंबीयांचा गुजरात राज्यात शनीवारी भीषण कार अपघात झाला होता. या अपघात वाहन चालक गणेश पाटील (२३) या मृत्यु झाला होता तर उपचारादरम्यान रविवारी पहाटे अपघातातील गंभीर जखमी कांचन चौधरी (४४) यांचादेखील मृत्यू झाला तर यात दोन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात गुजरात राज्यातील राजकोट जवळील धुंदका गावाजवळ घडला. या अपघातात किनगावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव टॅंकरने दिली धडक
किनगाव, ता.यावल येथील डॉ. अजय चौधरी (५०) त्यांच्या पत्नी कांचन अजय चौधरी (४४) व मुलगा नीतीश चौधरी (८) व कार चालक गणेश गोपाळ पाटील (२३) हे कार (क्रमांक एम. एच. १९ सी.यु.३०६२) व्दारे शनिवारी गुजरात राज्यातील वडताल येथे स्वामी नारायण मंदिरात दर्शनासाठी जात होते. दरम्यान तीन वाजेच्या सुमारास राजकोट जवळील धुंदका गावाजवळ त्यांच्या कारला टँकर (क्रमांक जी. जे. ३२ टी.७०२०) यांने जबर घडक दिली. समोरून दिलेल्या जबर धडकेत कार चक्काचुर झाली तर यातील चौघं गंभीर जखमी झाले. या जखमींना नागरीकांनी तत्काळ उपचाराकरीता रूग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान गणेश गोपाळ पाटील यांचा शनिवारी मृत्यू झाला तर रविवारी पहाटे पुर्वी कांचन चौधरी यांचा मृत्यू झाला. अपघातात डॉ.अजय चौधरी व त्यांचा मुलगा नितीश हे गंभीर जखमी आहे तर किनगाव येथून चंद्रकांत विठ्ठल चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटीलसह अनेक जण गुजरात राज्यात पोहचले असून जखमींवर अहमदाबाद येथे उपचार सुरू करण्यात आले तर मयत दोघांचे मृतदेह किनगावात आणण्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.


