किनगावच्या अविवाहित तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या
यावल : तालुक्यातील किनगाव येथे एका अविवाहीत तरुणाने विष प्राशन करीत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुदैवी मंगळवार, 5 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. योगेश सुकलाल धनगर (23) असे मयत तरुणाचे नाव आहे. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. किनगाव गावातील योगेश सुकलाल धनगर या तरुणाने मंगळवारी पहाटे किनगाव शिवारातील निवृती सीताराम चौधरी यांच्या शेतात काहीतरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली. सुकलाल धनगर यांचा एकुलता एक असलेल्या मुलगा योगेश हा गावातील एका मिनरल वॉटर पुरवठा करणार्या व्यावसायीकाकडे तो पाणीवाटप करण्याचे काम करीत होता शिवाय मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. किनगावचे पोलिस पाटील दीपक भिवसन साळुंके यांनी खबर दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी धनंजय पाचपोळ करीत आहेत. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

