दहिगावसह परीसरात वीज ग्राहकांना ज्यांदा बिलांचा शॉक
यावल : तालुक्यातील दहिगावसह परीसरात वीज कंपनीकडून ग्राहकांना अवाजवी वीज बिल आल्याने ग्राहक महावितरण वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. दहिगावसह सावखेडसीम, कोरपावली, महेलखेडी या गावांमधील ग्राहकांना वीज कंपनीकडून वीज बिलांची आकारणी मोठ्या प्रमाणात झाल्याने वीज बिले भरणे ग्राहकांना अवघड होत आहे. सर्वसामान्य नागरीक सद्य परीस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने रोजगार व उत्पन्न अत्यल्प येत असल्याने हातावर पोट भरणार्या व मोलमजुरी करणार्यांना वीज बिल भरणे अशक्य ठरत आहे.कोरोना महामारीपूर्वी वीज ग्राहकांना पन्नास शंभर ते दोनशे रुपये वीज बिल येत होते मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत वीज बिल आल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा
वीज ग्राहकांना महावितरण वीज कंपनीने त्वरीत हे पाठवलेले अवाजवी बिल दुरुस्ती करावे, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांमधून होत आहे. शासनाने अल्पभूधारक तथा मजुर वर्गांना मोफत वीज मीटर बसवून दिले असून वीज चोरीला आळा बसावा हा यामागील उद्देश होता मात्र याच मीटर धारकांना वीज कंपनीने हजारो रुपयांची वीज बिले पाठवून शॉक दिला आहे. उर्जा मंत्री यांनी ग्राहकांना कोरोना काळातील वीज बिल माफी करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने त्याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा आहे.


