भुसावळ पालिकेकडून आरोग्य केंद्रासाठी जागा देण्यासाठी टाळाटाळ
जागेअभावी आरोग्य केंद्राचा निधी परतीच्या मार्गावर
भुसावळ : भुसावळ शहराची व्याप्ती पाहता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले तर बांधकामासाठी 75 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला होता शिवाय जिल्हा परीषदेने भुसावळ पालिकेकडे या आरोग्य केंद्रासाठी जागेची मागणी केली मात्र प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा निधी परतीच्या मार्गावर आहे. या प्रकरणी आता आमदार संजय सावकारे व भाजपचे वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
निधी परत जाणार नाही : आमदार सावकारे
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून भुसावळात आरोग्य केंद्राची उभारणी होईल. पालिकेने जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून जागा उपलब्ध होऊन हा प्रश्न सुटणार असून निधी परत जाणार नाही, अशी ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी दिली.

वर्ष उलटूनही पालिकेकडे जागा मिळाली नाही
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भुसावळ शहरासाठी 2019-20 मध्ये शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते शिवाय त्यासाठी 75 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. जि.प.ने या निधीतून इमारत बांधकामासाठी पालिकेकडे जागेची मागणी केली आहे मात्र वर्ष उलटूनही जागा मिळाली नसल्याने निधी परतीच्या मार्गावर आहे.

