वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती अखेर उठवली
नागरीकांना 24 तास पाणी मिळेस्तोवर लढा सुरूच राहणार : माजी नगराध्यक्ष सुनील काळे
भुसावळ : वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती अखेर राज्य सरकारने उठवली असून त्याबाबत 6 रोजी सुधारीत सूचना निर्गमीत करण्यात आली आहे. दरम्यान, योजनेवरील स्थगिती उठवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती शिवाय अनेक आंदोलनही त्यासाठी करण्यात आले होते. योजनेवरील स्थगिती उठल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, माजी मंत्री आमदार संजय सावकरे, खासदार रक्षा खडसे यांचे माजी नगराध्यक्ष काळे यांनी आभार मानले आहेत.
भाजपाने केली अनेक आंदोलने
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी 13 सप्टेंबर 2019 रोजी 25 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली तसेच योजनेच्या पहिल्या टप्प्याचा निधी नगरपरीषदेच्या खात्यावर जमा केला मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंजूर योजनेवर स्थगिती आली. योजनेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, उपोषण तसेच जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता मात्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मोर्चा न काढण्याचे आवाहन करीत मंजूर पाणी योजनेचे काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन देत मान्यतेसाठी प्रस्ताव मंत्रालयात पाठवतो व वर्क ऑर्डर देतो, असे आश्वासन दिले होते.

वरणगावात भाजपाचा जल्लोष
राज्य सरकारने योजनेवरील स्थगिती उठवल्यानंतर गुरुवारी भाजपातर्फे वरणगावात बस स्थानक चौकात, शिवतीर्थ मैदानावर व नगरपरीषद कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, आजजरी मंजूर पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती भाजपाच्या आंदोलनामुळे उठली असली तरी जो पर्यंत वरणगावकरांच्या घरात 24 तास पाणी पोहचत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, ज्येष्ठ नेते हाजी अल्लाउद्दीन सेठ, अॅड.ए.जी.जंजाळे, मनोहर सराफ, रमेश पालवे, शामराव धनगर, संजयकुमार जैन, अजय पाटील, गोलू राणे, युसूफ खान, जावेद शाहा, डॉ.चांदणे, डॉ.साजीद, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, डी.के. खाटीक, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, शेख फहिम, भाऊलाल टिंटोरे, शंकर पवार, आकाश निमकर, कुंदन माळी, विकास माळी, लखन माळी, अझर खान, शोएब खान, अजय जैस्वाल, युसुफ खान, राहुल जंजाळे, अनिकेत चांदेखेडकर, महेश माळी, अनंत माळी, पप्पू ठाकरे, ज्ञानेश्वर घाटोळे, नथ्थू पवार, नटराज चौधरी, तेजस जैन, विशाल कुंभार, जय चांदणे, अंकुश साबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

