पालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अनिल चौधरींविरुद्ध दाखल झाला गुन्हा
चौधरींच्या फसवणुकीनंतरही दोषींवर पोलिसांकडून कारवाई शून्यू : माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत वकीलांचा दावा : न्यायप्रविष्ट बाब तरीही दाखल झाला गुन्हा
भुसावळ : आगामी पालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय कटाद्वारे बदनामी करण्यासाठी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मुळात गाळे खरेदी करून देण्याविषयी कुठलाही व्यवहार झालेला नाही शिवाय ते खरेदीखतदेखील बनावट असल्याने उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल करण्यात आल्यानंतरही अद्यापही दखल घेण्यात आली नाही, असा दावा चौधरी यांच्यावतीने आयोजित पत्रकार परीषदेत अॅड.राजेश शर्मा, अॅड.योगेश दलाल, अॅड.खालील शेख यांनी येथे केला. अनिल चौधरींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बाजू मांडण्यासाठी सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पैसे घेतल्याचे मान्य मात्र गाळे खरेदीचा करार नाही
तीनही वकीलद्वयींनी माहिती देताना स्पष्ट केले की, चौधरी यांनी संबंधितांकडून 60 लाख 70 हजार रुपये स्वीकारले हे आम्ही न्यायालयात सुद्धा लिहून दिले आहे मात्र गाळे खरेदीविषयी कुठलेही खरेदीखत झालेले नव्हते. चौधरी यांना पैशांची गरज असल्याने त्यांना तानाजी पाटील यांनी संबंधित तुम्हाला मदत करतील, असे सांगितल्याने उभयंतांची ओळख होवून त्यांनी आरटीजीएसद्वारे पैसे स्वीकारले मात्र त्यापोटी त्यांनी चौधरी यांच्या कोर्या कागदांवर स्वाक्षर्या घेतल्या.


बँकेच्या ताब्यातील प्रॉपर्टीचा सौदा कसा?
नवशक्ती आर्केडमधील ज्या गाळ्यांची खरेदी तक्रारदार मागत आहेत ती 3 जानेवारी 2020 रोजी आयसीआयसीआय बँकेच्या ताब्यात होती तर 19 ऑक्टोबर 2019 रोजी खरेदीखत करण्यात आल्याचे दर्शवले जात आहे. गाळे खरेदीबाबत तक्रारदाराने पाच महिन्यानंतर पत्र दिल्यानंतर 7 फेब्रुवारी 2020 रोजी दुय्यम निबंधकांना कागदपत्रे मागण्यात आली मात्र 26 फेबु्रवारी 200 रुपये डीडी स्वरूपात फी साठी पैसे भरण्याचे पत्र मिळाले. त्यानंतर डीडी काढला मात्र खाते नसल्याची संबंधित विभागाने सबब पुढे केली व 18 मार्च 2020 रोजी पुन्हा संबंधित खात्याने 345 रुपये जमा करण्याचे पत्रान्वये कळवले व नंतर मात्र दस्तावेज रजिष्टर नसल्याची सबब पुढे करून कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यानंतर 9 जून 2020 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयाने चौधरी यांना खरेदीखताचे दस्ता पूूर्ण करण्याबाबत नोटीस दिली.
बाजारपेठ पोलिसात तक्रार करूनही दखल नाही
सहा.निबंधकांच्या नोटीसीला उत्तर देताना सर्व घडलेली सत्य परीस्थिती कथन करण्यात आली. यावेळी दस्त रद्दची मागणी चौधरी यांनी सहा.निबंधक यांच्याकडे केली असता 17 जून 2020 रोजी सदरचे दस्त रद्द करीत असल्याचे संबंधित विभागाने कळवत न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. तत्पूर्वी 16 जून रोजी चौधरी यांनी बाजारपेठ पोलिसात तानाजी पाटील, ममता सुधाकर सनांसे, सुधाकर सनांसे व अन्य संशयीतांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला मात्र त्याची अद्याप ना चौकशी झाली ना कारवाई! असा दावाही वकीलांनी केला.
न्यायालयात जाण्याचा पोलिसांनीच दिला सल्ला
तक्रारदार सनांसे यांनी पोलिसांकडे अर्ज केल्यानंतर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सनांसे यांना ही बाब फौजदारी नसल्याचे सांगत सिव्हील मॅटर असल्याने न्यायालयात जाण्यासंदर्भात लेखी पत्रही दिले, असेही वकीलांनी सांगितले. सनांसे यांच्या पत्रानंतर त्यांना 17 फेब्रुवारी 2020 रोजी वकीलांमार्फत उत्तर देण्यात आले. संबंधितानी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आपल्या दाव्यात खरेदीखत करून मिळावे, अन्यथा रक्कम परत मिळावी अन्यथा मालमत्ता कुणालाही विक्री करू नये, अशी अट ठेवल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे आम्ही पालन करीत 60 लाख 70 हजारांची रक्कम कशी परत करावी हे न्यायालयाने सूचवावे तसेच सदर मालमत्तेची विक्री वा ती भाडे करारानेदेखील कुणालाही दिली नसल्याचे लिहून दिले आहे. एकीकडे न्यायालयात हे प्रकरण सुरू असताना दुसरीकडे पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर दिड महिन्यानंतर शनिवार, 23 जानेवारी रात्री 12.23 वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार राजकीय दबावातून घडला असून केवळ चौधरी कुटुंबियांची बदनामी व्हावी हाच उद्देश यामागे असून या कटकारस्थानांविरुद्ध न्यायालयात आम्ही दाद मागणार असल्याचे वकीलांनी सांगितले शिवाय संबंधितानी भूमी अभिलेख कार्यालयात मालमत्तेला नाव लावण्याबाबत दिलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून निश्चित आम्हाला न्याय मिळेल, असेही वकील बांधवांनी प्रसंगी सांगितले. यावेळी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, धीरज चौधरी, बबलू खान आदींची उपस्थिती होती.
