23 शिक्षकांना गुरूरत्न पुरस्कारने केले सन्मानीत


वरणगावात रुख्मिणी फाऊंडेशनच्या वतीने कार्यक्रम उत्साहात

वरणगाव : रुख्मिणी फाऊंडेशनच्या वतीने 23 शिक्षकांचा रविवारी वरणगाव पोलिस ठाण्याच्या सभागृहात सन्मान करण्यात आला. 5 सप्टेंबर रोजी वरणगाव व परीसरातील जिल्हा परीषद, माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना गुरूरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते.

यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, भुसावळ पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, पोलिस उपनिरीक्षक सुनील वाणी, प्रा.जतीन मेढे, ग.स. सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या वंदना चव्हाण, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सील ऑफ यंग सायंटीस्टचे संचालक सुनील वानखेडे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रुख्मिणी काळे, प्रणीता चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, भाजपा शहर अध्यक्ष सुनील माळी, मनोहर सराफ, शामराव धनगर, विलास तायडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष तथा रुक्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, वडील शिक्षक होते. त्यांना जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराचे हक्कदार होते परंतु तो पुरस्कार मिळू शकला नाही. यामुळे जो प्रसंग माझ्या वडीलांच्या बाबत घडला तो इतरांसोबत घडू नये यासाठी आईच्या नावाने रुख्मिणी फाऊंडेशनच्या वतीने सदरचा पुरस्कार दरवर्षी देण्याची प्रथा सुरू केली. यामुळे शिक्षकांना देखीलकेलेल्या कामाचे समाधान मिळते.


शिक्षक गौरवाने समाजाची उन्नती
डॉ. अनिल झोपे म्हणाले की, समाजात आदर्श व्यक्तीमत्व म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. समाजाने शिक्षकाचा गौरव केला म्हणजेच त्या समाजाची उन्नती होते. शिक्षक हा बदलाचा प्रणेता असतो. कामगिरी, क्षमता, बांधीलकी, आपला पेशा सांभाळण्याची क्षमता शिक्षकांमधे आहे. बदलत्या काळनुसार गरजा व क्षमतेनुसार गरज भासल्यास अवश्यक कौशल्य शिक्षकांमधे वाढविले जातात. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे सारख्या संस्था काम करत आहेत.

समाज घडविण्याचे काम शिक्षकांकडून
शिक्षण सभापती रवींद्र पाटील म्हणाले की, शिक्षकांपेक्षा कुणीच मोठा नाही सुजान नागरीक घडविण्याचे काम शाळांमधून होत असते. खर्‍या अर्थाने चांगले संस्कार शाळेमधेच घडत असतात. कोवळ्या मनाला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. यामुळे एक सुजाण व सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. हे काम चोख पणे बजावत असुन शिक्षकांपेक्षा मोठे कुणीच नाही.

लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याचे प्रशिक्षण गरजेचे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, माझा देश व माणुसकीची भावना प्रत्येकाच्या मनात असणे गरजेचे आहे. ही भावना खर्‍या अर्थाने रूजविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शिक्षकांच्या प्रेरणेमुळे जगासमोर येते आजच्या शिक्षण पध्दतीत शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञानावर देखील भर देणे गरजेचे आहे. देशा विषयाची निष्ठा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. लोकप्रतिनीधी कसा असला पाहिजे व तो कसा निवडावा याचे ज्ञान मिळाल्यास देश बळकटीकरण होईल.

यांनी घेतले परीश्रम
यावेळी वरणगाव पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकपदी सुनील वाणी यांची निवड व हवालदार गणेश शेळके यांना जळगाव येथे कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल कोरोना योध्दा शौर्य पुरस्काराने सन्मानीत केल्याने दोघांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जीवन महाजन तर आभार गजानन वंजारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !