रीक्षातून उतरणार्या प्रवाशाचा ओमणीच्या धडकेत मृत्यू
यावल : रीक्षातून उतरत असलेल्या प्रवाशाला भरधाव ओमनीने उडवल्याने त्याचा मृत्यूझाल्याची घटना कोळन्हावीपासून एक किलोमिटरवर असलेल्या फॉरेस्ट नाक्याजवळ 15 रोजी दुपारी एक वाजता घडली. सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र तपासाअंती अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. 15 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास डांभुर्णी ते जळगाव मार्गावर कोळन्हावी शिवारातील फॉरेस्ट नाक्याजवळ अरुण दगडू सोळुंके यांच्या शेताजवळ योगेश जनार्दन साळुंके (28, कोळन्हावी) हे आपल्या आई-वडील व कुटुंबासोबत एका रीक्षातून उतरत असतानाच डांभूर्णी गावाकडून जळगावकडे भरधाव जाणारी मारूती व्हॅन (क्रमांक एम.एच.19 सी.जे.2246) वरील वाहनचालक धीरज राजाराम पाटील (आव्हाणे, जि.जळगाव)ने योगेश साळुंके यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर वाहन चालकाने गाडी पळवून नेल्यानंतर ती उलटली व संशयीत पसार होण्यात यशस्वी झाला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद होती तर 24 रोजी जळगाव येथून यावल येथे गुन्हा वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


