वरणगावातील बेपत्ता व्यक्तीचा बोरघाटात आढळला मृतदेह
घातपाताची वर्तवली जातेय शक्यता
सावदा : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील 69 वर्षीय बेपत्ता वृद्धाचा मृतदेह पालघाटातील बोरघाटात सापडल्याने खळबळ उडाली आहे. चांगो रामदास झोपे (69) असे मयत इसमाचे नाव आहे. झोपे यांचा घातपाती मृत्यू झाल्याचा संशय आहे.
तीन दिवसांपासून होते बेपत्ता
सूत्रांच्या माहितीनुसार, चांगो झोपे हे वरणगाव येथे मुलगा राकेश झोपे व सूनसह राहतात. मुलगा व सून हे बाहेरगावी गेले असताना चांगो झोपे यांच्याशी मुलगा राकेश यांचे शेवटचे बोलणे 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता झाले होते. मुलगा राकेश गावाहून घरी परत आल्यानंतर त्यास घराला कुलूप लावलेले दिसल्याने त्याने वडिलांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र ते न आढळल्याने वरणगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी खिरोदा येथून जवळ असलेल्या पालघाटातील बोरघाटात हरविलेल्या चांगो झोपे यांचा मृतदेह आढळल्यान ेखळबळ उडाली. याबातची माहिती कळताच सावदा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले व पोलीस कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथे हलवला.



