भुसावळ पंचायत समिती सभापती-उपसभापतींचा राजीनामा
वंदना उन्हाळेंना मिळणार सभापतीपदाची संधी
भुसावळ : पंचायत समितीच्या दुसर्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये महिला राखीव पद निघाल्यानंतर मनीषा भालचंद्र पाटील यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती तर उपसभापतीपदी वंदना उन्हाळेंची निवड झाली होती. सोमवारी दोघांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता उपसभापती उन्हाळे यांची सभापतीपदावर वर्णी लागणार आहे.
ठरल्याप्रमाणे दिला राजीनामा
पंचायत समितीच्या सभापतीपदी अडीच वर्षानंतरच्या दुसर्या टर्ममध्ये भाजपच्या मनिषा भालचंद्र पाटील यांना संधी मिळाली होती. पक्षात यापूर्वी ठरल्याप्रमाणे त्यांनी सुमारे दीड वर्षांचा कार्यकाळ काढल्यानंतर सोमवारी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परीषद अध्यक्षांकडे दिला आहे. तर उपसभापती वंदना सदानंद उन्हाळे यांनीही आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहे. आगामी तब्बल एक वर्षांसाठी त्यांना आता सभापतीपदाची संधी मिळेल तर उपसभापतीपदी म्हणून माजी सभापती प्रीती मुरलीधर पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे एकमेव सदस्य विजय सुरवाडे यांना भाजप गोटात घेवून उपसभापतीपदाची संधी देण्याचे यापूर्वी नियोजन होते मात्र सुरवाडे यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला नाही यामुळे त्यांना भाजपने संधी नाकारली आहे. यामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकारणावरही काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



