भुसावळातील जामनेर रोडवरील पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेना आंदोलन करणार !
भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे ते नाहाटा चौफुली दरम्यान रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने आबालवृद्धांची मोठी गैरसोय होत आहे. केवळ शोभेची वास्तू ठरत असलेले पथदिवे सुरू करावेत अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा भुसावळ दक्षिण विभाग शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला.
तर तीव्र आंदोलन छेडणार
आधीच जामनेर रस्त्याची दूरवस्था झाली आहे त्यामुळे पथदिवे बंद असताना येथून वाहतूक करणे जिकिरीचे होते. जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. रहिवाशांना तब्बल चार वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत असून नगरपालिका प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नागरीकांची समस्या सोडवावी व नागरीकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा तसेच वेळेत दुरुस्ती न करणार्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटीका भुरा चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण उपस्थित होते.

हायमास्ट दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शहरात खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमास्ट पोल बसविण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेक पथदिवे फुटले असून अनेक खांबही गायब झाले आहेत. काही खांब मोडकळीला आले असून ते झुकल्यामुळे त्यातून अपघातांची शक्यता आहे. हे पथदिवे पुन्हा सुरू झाल्यास नागरीकांची सोय होईल. अपघातांचे प्रमाण कमी होण्यातही मदत होणार आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, पथदिवे बंद असल्याने त्यावर केलेला पाच कोटी 95 लाख रुपयांचा खर्च वाया जात आहे. पथदिव्यांवर जनतेचा पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जात आहे. अधिकार्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. नागरीकांची गैरसोय होत असून पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


