बोरघाट खूनाची उकल : दोघे आरोपी जाळ्यात


सावदा : सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील पाल जवळील घनदाट अश्या बोरघाटात 1 रोजी सकाळी वरणगाव येथील चांगो रामदास झोपे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी सावदा पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, मयताच्या घरातून आरोपींनी रोकड लांबवल्यानंतर ती परत करण्यसाठी झोपे यांनी तगादा लावल्याने आरोपींनी त्यांचा खून केल्याची केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

आधी बेपत्ता नंतर आढळला मृतदेह
मयत चांगो हे 29 जानेवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर वरणगाव पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे लोकेशन महाराष्ट्र व मध्यप्रदेश दरम्यान दाखवत असताना 1 रोजी घाटात त्यांचा मृतदेह आढळला. पोलिस तपासात वरणगावातील एका सीसीटीव्ळी फुटेजमध्ये एक संशयीत झोपे यांना दुचाकीने गुरांच्या बाजाराजवळ सोडताना दिसून आला व त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली. संशयीत शेख जाबीर शेख कादीर (32) व शेख जावेद शेख खलील (32, दोन्ही रा.वरणगाव) यांची बारकाईने चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सावदा सहा.निरीक्षक देविदास इंगळे, वरणगाव सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे, सावदा उपनिरीक्षक राजेंद्र पवार व सहकार्‍यांनी एकत्रीत तपास करीत 13 तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल केली.

चोरी केलेल्या पैशांसाठी तगादा लावल्याने खून
मयत चांगो झोपे यांच्या घरी आरोपींचे येणे-जाणे होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरातून रोकड चोरीला गेल्याने आरोपींनी ही रोकड चोरल्याचा झोपे यांना संशय असल्याने त्यांनी आरोपींकडे चोरी झालेली रक्कम परत मागितली होती. झोपे यांचा मुलगा बाहेर गावी गेल्याची संधी साधून आरोपींनी झोपे यांना विश्वासात घेऊन चोरी केलेले पैसे परत देतो, असे सांगून एका मित्राच्या चारचाकीत सावदा स्टेशन, मस्कावदमार्गे पाल घाटात नेत त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केला. मयताच्या हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची कासवाच्या आकाराची अंगठी, गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन सोन्याचे बसवलेले दात गायब असून आरोपींनी ते लांबवल्याचा संशय आहे. घटनास्थळी मयताच्या अंगातील स्वेटर, तुटलेला चष्मा, पायातील चप्पल, मनगटी घडयाळ, पेन आदी वस्तू आढळल्या. गुन्हा करण्यासाठी वापरलेला दगड पोलिसांनी जप्त केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !