वाळूची विनापरवाना वाहतूक : ट्रक चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई : ट्रकही केला जप्त
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कारवाईचे दिल्यानंतर पथकाने नाहाटा चौफुलीवर विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. ट्रकमध्ये 15 हजार रुपये किंमतीची वाळू आढळली. या प्रकरणी ट्रकच चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक मालक सुनील विश्वनाथ भोई (भवानी नगर, साकेगाव) व चालक देविदास लटकन कोळी (साकेगाव, ता.भुसावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
शहरात अहोरात्र विना परवाना वाळू होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाकडे धडक कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांचे मोठे फावले आहे. सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यायाजवळ पथकाने ट्रक (एम.एच.27 एक्स.3306) ची तपासणी केली असता त्यात 15 हजार रुपये किंमतीची वाळू आढळली. चालक देविदास कोळी यास वाळू परवान्याबाबत विचारल्यानंतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रक जप्त करीत कोळीसह ट्रक मालक भोईविरुद्ध प्रशांत परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, प्रशांत परदेशी,रमण सुरळकर, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.



