रावेर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीकडे लागले लक्ष
रावेर : जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीयदृष्ट्या चर्चेला असलेल्या रावेर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदासाठी लवकरच निवडणूक होत असून येथे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. माजी मंत्री खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर येथे होत असलेल्या निवडणुकीत भाजपाला रावेरपासून सुरूंग लावण्याची नामी संधी माजी मंत्री खडसे यांच्याकडे आहे. दुसरीकडे भाजपाचाच सभापती करण्याची जबाबदारी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे असणार आहे त्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खडसेच्या बालकिल्ला असलेला रावेर पंचायत समितीमध्ये कोणत्या गटाचा सभापती बसतो ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्ष प्रवेशानंतर प्रथमच मोठ्या संस्थेची निवडणूक
माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच रावेर पंचायत समितीची सभापती-उपसभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. आतापर्यंत तेथे माजी मंत्री खडसे सूचवतील त्या उमेदवाराचीच सभापती-उपसभापती पदावर वर्णी लागत होती. येथे निवडून आलेले बहुतेक भाजपा सदस्य हे खडसे गटाचे आहे. येथे भाजपाच सभापती-उपसभापती व्हावा म्हणून स्वत: माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे यांचे लक्ष आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री खडसेंच्या रावेर या बालकिल्ल्यात भाजपाचे पाणीपत होते की खडसे आपली ताकद दाखवून महाविकास आघाडीचा सभापती करतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे आहे पक्षीय बलाबल
रावेर पंचायत समितीत भाजपाचे आठ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन, शिवसेनेचा एक तर काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समिती सदस्य आहे. यापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सुचनेवरुन येथे माधुरी नेमाडे यांना अडीच वर्ष सभापती पदाची संधी मिळाली तर सुमारे वर्षभरापासून जितेंद्र पाटील हे सभापती पदावर विराजमान आहे तर आता ठरल्याप्रमाणे कविता कोळी या भाजपाकडून सभापती होतील असा विश्वास भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांना आहे. सद्या रावेर पंचायत समिती बद्दल माजी मंत्री खडसेची यांनी रावेर पंचायत समितीमध्ये मागासवर्गीय उमेदवाराला संधी मिळण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे. ठरल्याप्रमाणे अखेर उपसभापती जुम्मा तडवी यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे .लवकरच सभापतीही राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.


