भुसावळातील मूलभूत समस्या मार्गी लागणार !


मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची शिवसेना पदाधिकार्‍यांना भेटीप्रसंगी ग्वाही

भुसावळ : भुसावळ मध्यवर्ती शिवसेना कार्यालयातर्फे शिवसेना पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेत शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासंदर्भात साकडे घालण्यात आले. नागरीकांच्या मूलभूत सेवा तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही मुख्याधिकार्‍यांनी दिली.

प्रलंबित समस्या मार्गी लावणार
शहरातील यावल रस्त्याचे काम त्वरित सुरू केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे व नगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर, संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या सहकार्याने या बैठकीचे नियोजन करण्यात आले. यात विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून नाट्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सुसज्ज नाट्यगृह ते साकार करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सोमानी गार्डनच्या जवळ जागा देण्याचे मुख्याधिकार्‍यांनी मान्य केले शिवाय सिग्नलची अत्याधूनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्रीडा संकुल ताब्यात घेऊन ते लवकरच सुरू करणार आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला कोट्यवधीचा निधी खर्च करून भुसावळमध्ये रस्त्यांचा प्रश्न आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता हे विषय मार्गी लावले जातील. कोणताही निधी परत जाऊ दिला जाणार नाही, असेही मुख्याधिकारी म्हणाले.


हॉकर्स झोन तयार करणार
छोटे व्यावसायीक आणि अतिक्रमणधारकांसाठी आठवडे बाजारात हॉकर्स झोन तयार करून त्यांना पर्यायी जागा दिली जाणार असल्याचे देखील मुख्याधिकारी म्हणाले. घनकचरा विल्हेवाटीसाठी आयटीआय जवळ चोरवड सब स्टेशनच्या मागे जागा निश्चित केली जाणार असल्याची माहिती चिद्रवार यांनी देत भुसावळचा रींग रोड जमीन अधिग्रहणाचा प्रश्न नगररचना विभागाकडून मार्गी लावला जाणार आहे. अमृत योजना पूर्णत्वास येण्यासाठी अजून सुमारे दोन ते अडीच वर्षे लागणार असल्याने आता अस्तित्वात असलेली पाणी पाणीपुरवठा योजना वेळेवर चार ते पाच कोटी रुपये खर्चून लोकांना मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितले. नगरपालिकेची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाणार नाही जे मोठे-मोठे थकबाकीदार आहेत व सुमारे आठ ते दहा वर्षांपासून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती गठीत करून नगरपालिकेची वसुली वाढवली जाणार आहे त्यातून विविध विकासकामांना गती देण्यात येईल यापुढे शहरात नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेऊन रीतसर किरकोळ वसुलीचे पैसे भरल्याशिवाय कोणतेही ब्लॅकबोर्ड लावू दिले जाणार नाही. या सर्व मागण्या यांनी मान्य केल्या.

यांची होती उपस्थिती
चर्चेच्या प्रसंगी रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर यांनी चर्चेत भाग घेतला उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी प्रलंबित प्रश्नांची मांडणी शिष्टमंडळासमवेत याप्रसंगी मुख्याधिकार्‍यांकडे केली. विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू मराठे, जग्गू खेराडे योगेश बागुल यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या असल्याची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी कळविले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !