सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश : तिघांना अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याला आरोपींनी लक्ष्य केल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तिघेही आरोपी आठवी आणि दहावीचे शिक्षण घेतलेले आहेत. विशेष म्हणजे हे आरोपी समाजातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू लोकांना टार्गेट करतात. यामध्ये अधिकारी, राजकारणी, आयएएस, आयपीएस, आमदार, खासदार आणि अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश आहे.
संबंध वाढवून ब्लॅकमेलिंग
सुरुवातीला सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा फोटो ठेवून एक बनावट अकाऊंट उघडण्यात येतं. त्याद्वारे या प्रतिष्ठीत लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. नंतर संबंध वाढवले जातात. या प्रकरणात पूजा शर्मा या फेसबुकवरील अकाऊंटच्या नावाने लोकांना बळी पाडलं जात होतं. त्यामुळे पूजा शर्मा या नावाची तब्बल 151 फेसबुक अकाऊंट आणि काही टेलिग्राम चॅनेल्सही बॅन करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवस लोटल्यानंतर सोशल मीडियावर जवळीक वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीला अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल केला जातो आणि अश्लील व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या जातात. असावधपणे समोरच्या व्यक्तिने तो व्हिडिओ पाहिल्यास त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याद्वारे त्याला ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी केली जाते. खंडणी न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते. आपली बदनामी टाळण्यासाठी पीडित व्यक्ती आरोपींना पैसे देऊ करतात.

