लाचखोर शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात
शेगाव : गट ग्रामपंचायत अंतर्गत लावण्यात आलेल्या हायमास्टचे बिल काढण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारणार्या शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड, (57, रा.सुटाळा खुर्द, ता.खामगाव) यांना बुलढाणा एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच मंगळवारी दुपारी अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
लाच स्वीकारताच केली अटक
सांगावा येथील 42 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. 2019 20 मध्ये सांगावा गट ग्रामपंचायत अंतर्गत एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत हायमस्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले होते. हे काम 2020 मध्ये पूर्ण झाले असून आहे केलेल्या कामाचे बिल एक लाख 43 हजार 700 रुपये झाले असून त्याचे पाच टक्के म्हणून सात हजार 500 रुपये लाचेची मागणी करीत तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारल्याने आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आर.एन.मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रविंद्र दळवी, विजय मेहेत्रे, चालक अरशद शेख आदींच्या पथकाने केली.







