बीएचआर घोटाळा : पुणे गुन्हे शाखेने पाच संशयीतांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
जळगाव : बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मंगळवार, 23 फेब्रुवारी रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तेथील न्यायालयात पाच संशयिताविरोधात 2 हजार 400 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
अपहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल
रंजना घोरपडे व त्यांनी बहिण यांची मिळून बीएचआरच्या शाखेत 16 लाख 90 हजार 142 रुपयांची गुंतवणूक केली होती. या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संशयितांनी बीएचआर पतसंस्थेची पुणे येथील घोलेरोड, पिंपळेगुरव, आंबेगाव, निगडी व जामनेर येथील मालमत्ता कमी किंमतीत विकून त्यामध्ये 48 कोटी 56 लाख 25 हजार 820 रुपयांचा अपहार केला. तसेच 13 कोटी 17 लाख 72 हजार 201 रुपयांचा संशयास्पद असा व्यवहार केला. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात डेक्कन येथील गुन्ह्यातच एकूण 61 कोटी 90 लाख 88 हजार 163 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चौकशी अंती आज 23 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पुणे येथील न्यायालयात संशयित सुरज झंवर वगळता अटक करण्यात आलेल्या सुजीत वाणी, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकर, कमलाकर कोळी यांच्या विरोधात 2 हजार 400 पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे.








यांनी केला यशस्वी तपास
पुणे आर्थिक गुनहे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुचेता खोकले, पोलीस निरिक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक सतीश वाळके, सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत ननावरे, आसाराम शेटे, पोलीस अंमलदार वैजनाथ शिंदे, माधव करंदीकर, महेंद्र बाविस्कर, रऊफ इनामदार, रमाकांत कांबळे, मनोहर सोनवणे, निलिमा गोसावी, सपना म्याना, सोनाली गायकवाड, नूतन जवेरी, आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडून दिवसरात्र या गुन्ह्याचा तपास तसेच चौकशी करण्यात येवून संशयितांना अटक करण्यासह पुरावे संकलनाचे काम करण्यात आले. पुण्यात गुन्हा दाखल असला तरी संशयित हे जळगावातील रहिवासी आहे. पथकाने वेळावेळी 400 ते 500 किलोमीटरचे अंतर प्रवास करत तपास करत संशयितांना अटक केली व 90 दिवसांच्या आत न्यायालयात संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.