रेखा जरे हत्याकांड : आरोपी पत्रकार बाळ कोठे फरार घोषीत
अहमदनगर : हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले असून न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत आरोपीला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तपासात बाळ बोठे याचा सहभाग आढळल्यापासून पोलस त्याचा शोध घेत आहेत. स्टँडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 1 मार्चच्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर गुरूवारी न्यायालयाने अंतिम आदेश दिला. जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुद्ध 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले आहे. बोठेच्या अटकेनंतर त्याच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.