लाच मागणीनंतर एसीबीचा डिव्हाईस लांबवणारा पोलिस नाईक गवसेना !
जळगाव : एसीबी ट्रॅप होत असल्याचा संशय आल्यानंतर धरणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक तथा आरोपी विलास बुधा सोनवणे (रा.अमळनेर. ता.अमळनेर) यांनी तक्रारदाराकडील डिव्हाईस लांबवल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी अमळनेर शहरात घडली होती. या प्रकरणी संशयीत पोलिस नाईकाविरुद्ध अमळनेर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या कर्मचार्याचा सर्वत्र कसून शोध घेतला जात असून अद्याप कर्मचारी सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने जिल्ह्यातील पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
संशय येताच लांबवले डिव्हाईस
बांभोरी बु.॥, ता.धरणगाव येथील 48 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध धरणगाव पोलिसात 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबदल्यात धरणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक तथा संशयीत आरोपी विलास बुधा सोनवणे (रा.अमळनेर) यांनी 19 हजार रुपये लाचेची मागणी केली होती मात्र तक्रारदाराने आपल्यावर ट्रॅप आणल्याचा संशय सोनवणे यांना येताच त्यांनी तक्रारदाराकडे एसीबीने दिलेले डिव्हाईस हिसकावून धूम ठोकली. या प्रकाराने अधिकारीदेखील अवाक् झाले. आरोपी सोनवणे यांच्याविरुद्ध अमळनेर शहर पोलिसात गु.र.नं.119/2021 भ्र.प्र.अ.-कलम-7 सह कलम-392, 201, 186 भादवि अन्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत नाईक पसार झाल्याने त्याचा जिल्ह्यात कसून शोध सुरू आहे.







